dhruv jurel emotional | नवी दिल्ली: भारतीय संघ २५ जानेवारीपासून मायदेशात इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी काही नव्या चेहऱ्यांना संघात स्थान मिळाले आहे. तर, इशान किशनला वगळले. लोकेश राहुल, केएस भरत आणि ध्रुव जुरेल या तीन यष्टीरक्षक फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. युवा यष्टीरक्षकला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर तो भावूक झाला.
सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. भारत आणि इंग्लंड यांच्यात २५ जानेवारीपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. ध्रुव जुरेलने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू येत आहेत", असे ध्रुव जुरेलने म्हटले.
पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि आवेश खान.
कोण आहे ध्रुव जुरेल?भारतीय संघात युवा ध्रुव जुरेलला स्थान मिळाले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो उत्तर प्रदेशकडून खेळतो. २३ वर्षीय ध्रुव १९ वर्षाखालील भारत अ संघाकडून खेळला आहे. त्याचा देशांतर्गत क्रिकेटमधील रेकॉर्ड चांगला आहे. ध्रुवने १५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये ७९० धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली. यासोबतच ध्रुवने इंडियन प्रीमियर लीगमध्ये देखील कमाल दाखवली आहे.