नॉर्थ साऊंड (अँटिग्वा) : चार वेळचा विश्वविजेता भारतीय संघ विक्रमी पाचव्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी आज, शनिवारी बलाढ्य इंग्लंडविरुद्ध भिडेल. स्पर्धा इतिहासात सर्वांत यशस्वी असलेल्या भारतीय संघाने सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. टीम इंडियाची वाटचाल अत्यंत खडतर राहिली आहे. कोरोनामुळे प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताने अखेरच्या दोन साखळी सामन्यांमध्ये कसेबसे ११ खेळाडू खेळवले. मात्र तरीही भारतीयांनी दिमाखात आगेकूच केली.
इंग्लंड संघही स्पर्धेत अपराजित आहे. मात्र, उपांत्य सामन्यात त्यांना तुलनेत कमी अनुभवी असलेल्या अफगाणिस्तानविरुद्ध केवळ १५ धावांनीच बाजी मारता आली. भारतीय कर्णधार यश धूल आणि उपकर्णधार रशीद खान यांना कोरोना झाल्याने त्यांना तीनपैकी दोन सामन्यांत खेळता आले नव्हते. मात्र, उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोघांनी प्रतिकूल परिस्थितीत द्विशतकी भागीदारी करीत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका निभावली होती. सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी आणि हरनूर सिंग यांना अंतिम सामन्यात सूर गवसला, तर इंग्लंडला भारतीयांना रोखणे कठीण होईल.
संघ सहकाऱ्यांचा विचार करणारा कर्णधारगोलंदाजीतही भारतीयांनी प्रभावी कामगिरी केली. राजवर्धन हंगरगेकर, रवी कुमार या वेगवान गोलंदाजांनी भेदक मारा केला. विकी ओस्तवाल आणि कौशल तांबे यांनी फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचविले. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने उपांत्य सामन्यानंतर भारतीय युवा क्रिकेटपटूंशी संवाद साधत त्यांचा आत्मविश्वास आणखी उंचावला.
दुसरीकडे, इंग्लंडने १९९८ साली जिंकलेल्या विश्वचषकानंतर त्यांना या स्पर्धेत बाजी मारता आलेली नाही. यंदा त्यांचा धडाका पाहता भारतीयांना तगडे आव्हान मिळणार यात शंका नाही. कर्णधार टॉम प्रेस्टने ७३च्या सरासरीने २९२ धावा कुटल्या. वेगवान गोलंदाज जोशुआ बॉयडेनने १३ बळी घेत भेदक मारा केला आहे.
यश धूल शालेय जीवनापासून आपल्या फलंदाजीने प्रभावित करत आहे. त्याच्यातील कर्णधार लहानपणीच सर्वांनी अनुभवला होता. मूळचा दिल्लीचा असलेला धूल बाल भवन शाळेचा विद्यार्थी. येथेच क्रिकेटची गोडी लागलेल्या धूलला सुरुवातीला शाळेच्या अंतिम संघात संधी मिळाली नाही. त्याने आपले प्रशिक्षक राजेश नागर यांच्याकडे अनेकदा विनवणी केली. यानंतर त्याला एक सामना खेळण्याची संधी दिली आणि ही त्याच्यासाठी अखेरची संधी असेही म्हटले. ही संधी अचूकपणे साधत धूलने नाबाद १२५ धावा फटकावल्या. या खेळीनंतर आनंदित झालेल्या मुख्याध्यापकांनी धूलला ५०० रुपये बक्षीस दिले आणि विचारले की, ‘या पैशांचे काय करणार?’ त्यावर धूल म्हणाला की, ‘संघातील खेळाडूंना पार्टी देणार. कारण क्रिकेटमधील यश सांघिक कामगिरीवर निर्भर असते.’ याच गुणांमुळे धूल आज एक कर्णधार म्हणून आपली छाप पाडत आहे. धूलच्या क्रिकेटसाठी त्याच्या कुटुंबीयातील सर्व सदस्यांनी योगदान दिले. धूलचे आजोबा भारतीय सेनेत कार्यरत होते आणि त्यांच्याकडूनच धूलला शिस्तीचे धडे मिळाले.
फायनलपूर्वी विराटचा ‘यंगिस्तान’ला गुरुमंत्र...n भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून आठव्यांदा अंडर-१९ विश्वचषक २०२२च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शनिवारी जेतेपदासाठी भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. मोठ्या सामन्यापूर्वी वरिष्ठ संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने युवा क्रिकेटपटूंशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला आणि त्यांना काही टिप्सही दिल्या. n विराटने स्वत:च्या नेतृत्वात २००८ मध्ये भारताला १९ वर्षाखालील चॅम्पियन बनवले होते. कौशल तांबे आणि राजवर्धन हंगरगेकर या खेळाडूंनी विराटसोबतच्या त्यांच्या संभाषणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हंगरगेकरने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, ‘विराट कोहली भैयासोबत संवाद साधून खूप आनंद झाला. तुमच्याकडून आयुष्य आणि क्रिकेटबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या, या गोष्टी आम्हाला आगामी काळात खेळ सुधारण्यास मदत करतील.’प्रतिस्पर्धी संघभारत : यश धूल (कर्णधार), हरनूर सिंह, अंगक्रिश रघुवंशी, शेख रशीद, निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनीश्वर गौतम, मानव पारख, कौशल तांबे, राजवर्धन हंगरगेकर, विकी ओस्तवाल, गर्व सांगवान, दिनेश बाना, आराध्य यादव, राज बावा, वासू वत्स आणि रवी कुमार.इंग्लंड : टॉम प्रेस्ट (कर्णधार), जॉर्ज बेल, जोशुआ बॉयडेन, एलेक्स होर्टन, रेहान अहमद, जेम्स सेल्स, जॉर्ज थॉमस, थॉमस एस्पिनवाल, नाथन बर्नवेल, जेकब बेथेल, जेम्स कोलेस, विलियम लक्सटन, जेम्स रियू, फतेह सिंग आणि बेंजामिन क्लिफ.सामन्याची वेळ : सायंकाळी ६.३० वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार)