Join us

VIDEO: इंग्लंडच्या बटलरने व्हीलचेअरवर बसलेल्या दिव्यांग क्रिकेटरची घेतली सही, कोण आहे तो?

Jos Buttler Video, Ind vs Eng T20 : जोस बटलरने केलेल्या 'त्या' कृतीने जिंकली चाहत्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 10:11 IST

Open in App

Jos Buttler Video, Ind vs Eng T20 : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात क्रिकेटचा संघर्ष रंगणार आहे. दोन्ही संघ प्रथम पाच टी२० आणि नंतर तीन वन डे सामन्यांमध्ये आमनेसामने येतील. त्याची सुरुवात आजपासून कोलकातामध्ये होईल, जिथे पहिला T20 सामना खेळवला जाणार आहे. पण या सामन्यापूर्वी इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलरचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तो एका भारतीय क्रिकेटरचा ऑटोग्राफ घेताना दिसत आहे. भारतीय चाहते बटलरच्या दिलदारपणाचे कौतुक करत आहेत. पण हा क्रिकेटर कोण आहे, बटलरने त्याची सही का घेतली? जाणून घेऊया.

बटलरने घेतली दिव्यांग क्रिकेटरची सही, कारण...

१९ फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी श्रीलंकेत दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संघाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या सामन्यात व्हीलचेअरवर बसलेला क्रिकेटर धरमवीर पाल हा भारतीय संघाचा भाग होता. बटलरने त्याला विमानतळावर पाहिले, तेव्हा तो लगेच त्याच्याकडे गेला आणि त्याच्या बॅटवर धरमवीरची सही घेतली. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

टीम इंडियाने जिंकली दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी

दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि इंग्लंडच्या संघांनी अंतिम फेरीत धडक मारली होती. विजेतेपदाच्या लढतीत भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत इंग्लंडचा ७९ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत ट्रॉफी जिंकली. फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत १९७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ११८ धावांत गडगडला. भारताच्या योगेंद्र भदोरियाने ४० चेंडूत ७३ धावा केल्या. राधिका प्रसादने १९ धावांत ४ बळी घेतले. भारताचा कर्णधार विक्रांत केणी याने ३ षटकांत १५ धावांत २ बळी घेतले.

टॅग्स :भारत विरूद्ध इंग्लंड २०२५भारतीय क्रिकेट संघजोस बटलरसोशल मीडियासोशल व्हायरल