Join us  

दुसऱ्या कसोटी सामन्यात कोणात्या खेळाडूची एन्ट्री होणार?; पाहा भारताची संभाव्य Playing XI

Ind Vs Eng: मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथील वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 8:19 AM

Open in App

भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये झाला, ज्यामध्ये भारतीय संघाला २८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंड संघाने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथील वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. 

दुसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० पासून खेळवला जाईल. या सामन्यात प्लेइंग XI निवडणे भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी डोकेदुखीपेक्षा कमी असणार नाही. याचे कारण विराट कोहली, रवींद्र जडेजा, केएल राहुल आणि मोहम्मद शमी संघात नाहीत. तर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर अतिशय खराब फॉर्ममध्ये झगडत आहेत. अशा परिस्थितीत दुसऱ्या सामन्यासाठी कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात.

गिल आणि अय्यर किंवा त्यांच्यापैकी एकाला संघाबाहेर बसवण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी रजत पाटीदार आणि सरफराज खानला संधी मिळू शकते. असे झाल्यास रजत आणि सरफराजचाही पदार्पण सामना असेल. मात्र, गिल आणि अय्यरला बाहेर ठेवण्याची आशा फार कमी आहे. ते दोघे खेळले तर रजत किंवा सरफराजला संधी मिळेल.

गिल आणि श्रेयसचा वाईट फॉर्म

गिलने गेल्या ६ कसोटी सामन्यांच्या ११ डावात एकही अर्धशतक झळकावलेले नाही. त्याचे शेवटचे अर्धशतक मार्च २०२३ मध्ये झाले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटीत १२८ धावांची खेळी खेळून शतक झळकावले. तर श्रेयसने गेल्या ६ कसोटींच्या १० डावांत एकही अर्धशतकही ठोकलेले नाही. त्याने शेवटचे अर्धशतक डिसेंबर २०२२ मध्ये केले होते. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या मीरपूर कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ८७ धावा केल्या. अशा परिस्थितीत या दोघांपैकी एकाला दुसऱ्या सामन्यापासून विश्रांती दिली जाऊ शकते.

दुसऱ्या कसोटीत भारताची संभाव्य प्लेइंग-XI

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल/रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, सरफराज खान/रजत पाटीदार, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर/कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.

दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ