IND vs ENG in World Cup 2023 : भारतीय संघाने तुल्यबळ न्यूझीलंड विरूद्ध रोमहर्षक विजय मिळवला. विराट कोहलीच्या ९५ धावांच्या खेळीमुळे आणि मोहम्मद शमीच्या पाच बळींच्या जोरावर भारताने विकेट मिळवली. भारताचा पुढचा सामना पुढच्या रविवारी इंग्लंड विरूद्ध होणार आहे. याचदरम्यान, इंग्लंडच्या संघाने एका नव्या खेळाडूला संघात बोलवून घेतले आहे. विश्वचषकासाठी डावखुरा वेगवान गोलंदाज रीस टॉप्ली दुखापतग्रस्त झाल्याने, त्याच्या जागी ब्रायडन कार्सची निवड करण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टॉप्लीला बोटाला दुखापत झाली होती. त्याने 8.5 षटके टाकली. त्यानंतर त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले. तेथे फ्रॅक्चर आढळून आले. सामन्यात त्याने तीन विकेट घेतल्या होत्या. तर स्पर्धेत आतापर्यंत तीन सामन्यांत त्याने आठ बळी टिपले. टॉप्लीला दुखापत झाल्याने त्याच्या जागी संघात लोकप्रिय गोलंदाज जोफ्रा आर्चरचा समावेश केला जाईल असे सांगितले जात होते. पण ब्रायडन कार्सची वर्णी लागली. उजव्या हाताने गोलंदाजी करणारा कार्स तुलनेने नवोदित खेळाडू आहे. इंग्लंडच्या 2019 च्या विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जोफ्रा आर्चरला डावलून कार्सची निवड झाली आहे. त्यामुळे तो कशी कामगिरी करतो याकडे साऱ्यांचेच लक्ष असेल.
भारताचा पुढील सामना थेट इंग्लंडशी रविवारी असला तरी इंग्लंड त्याआधी श्रीलंकेशी खेळणार आहे. त्यामुळे या नव्या खेळाडूबद्दल अंदाज घेण्यासाठी भारतीय फलंदाजांची इंग्लंड-श्रीलंका सामन्यावर बारीक नजर असणार आहे.
ब्रायडन कार्सची कारकीर्द- ब्रायडन कार्स आतापर्यंत इंग्लंडसाठी 12 एकदिवसीय सामने खेळला आहे. 2021 मध्ये त्याने पदार्पण केले. त्याच्या खात्यात आतापर्यंत 14 विकेट आहेत. सप्टेंबरमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या चार सामन्यांच्या वनडे मालिकेदरम्यान तो संघात होता. त्याने आयर्लंडविरुद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्येही चांगली कामगिरी केली होती.