लंडन : ‘विराट कोहली भारताचा कर्णधार असता, तर यजमान संघाला हैदराबादच्या पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला नसता,’ असे धक्कादायक वक्तव्य इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने बुधवारी केले. ‘सामन्यादरम्यान रोहित शर्माचे लक्ष अन्यत्र होते,’ असेही वॉनने म्हटले आहे.
पहिल्या डावात १९० धावांची भक्कम आघाडी मिळविल्यानंतरही विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारताला फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर २८ धावांनी पराभवाचा धक्का बसला. यामुळे इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली आहे. कोहली हा वैयक्तिक कारणास्तव पहिला सामना खेळला नव्हता, शिवाय तो दुसऱ्या कसोटीतही दिसणार नाही. कोहलीने २०२२ च्या भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर कर्णधारपद सोडले होते. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने कसोटीत अव्वल स्थान काबीज केले होते.
वॉन यू-ट्यूब चॅनलवर म्हणाला, ‘कसोटीत मला विराटच्या नेतृत्वाची उणीव जाणवली. विराटने नेतृत्व केले असते तर भारत हरला नसता. सामन्यादरम्यान रोहितच्या नेतृत्वावर मला आक्षेप आहे. रोहित दिग्गज असला तरी सामन्यादरम्यान त्याचे लक्ष विचलित झाले होते. त्याचे नेतृत्व साधारण होते. त्याने क्षेत्ररक्षणाची रचना करताना चाणाक्षपणा दाखविला नाही, शिवाय गोलंदाजीतही वारंवार बदल केले नाहीत. ओली पोपच्या स्विप-रिव्हर्स स्विपचे रोहित शर्माकडे उत्तर नव्हते.’
भारतात यष्टिरक्षण सर्वांत अवघड : फोक्स
विशाखापट्टणम : ‘भारतातील खेळपट्ट्यांवर यष्टिरक्षण करणे सर्वांत अवघड असून, यष्टिरक्षकाला वेगळा विचार करण्याची गरज भासते,’ असे मत इंग्लंडचा यष्टिरक्षक बेन फोक्स याने व्यक्त केले. ११ महिन्यानंतर कसोटीत पुनरागमन करणाऱ्या फोक्सने हैदराबाद कसोटीत रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज यांना यष्टिचित केले होते.
एका मुलाखतीमध्ये फोक्स म्हणाला, ‘भारतीय परिस्थितीत वेगळे काही करण्याची गरज असते. मी इंग्लंडबाहेर आणि फिरकीविरुद्ध बरेच यष्टिरक्षण केले, पण असमान उसळी असलेल्या भारतीय खेळपट्ट्यांवर यष्टिरक्षण करणे कठीण आहे.’ ३० वर्षांचा फोक्स मालिकेतील उर्वरित चार सामन्यातही विपरीत परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज आहे. तो पुढे म्हणाला, ‘दुसरी कसोटी चुरशीची होईल, यात शंका नाही. त्यावेळीदेखील अशा आव्हानांचा सामना करावा लागेल.’
२०२१ च्या दौऱ्यातही इंग्लंडने भारतात पहिली कसोटी जिंकली होती, पण नंतर फिरकीला पूरक खेळपट्ट्यांवर सलग तीन सामने गमावून चार सामन्यांच्या मालिकेत पराभूत झाला होता. त्या मालिकेच्या आठवणींना उजाळा देत फोक्स पुढे म्हणाला, ‘मी त्यावेळी फलंदाजी केली होती. त्या तिन्ही खेळपट्ट्या माझ्या मते खराब होत्या. त्यावेळी खेळपट्ट्यांवर स्थिरावण्यासाठी मला संघर्ष करावा लागला होता.’
जॅक लीच दुखापतग्रस्त
विशाखापट्टणम : इंग्लंडचा अनुभवी फिरकी गोलंदाज जॅक लीच हा दुखापतीमुळे बुधवारी दुसऱ्या कसोटीआधीच्या सराव सत्रात सहभागी झाला नव्हता. लीच या सामन्यात खेळणार की नाही, हे देखील निश्चित नाही. हैदराबाद येथे पहिल्या कसोटीदरम्यान लीचच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. आज त्याने मैदानाबाहेर फिजियोकडून उपचार घेतले.
याबाबत झॅक क्रॉली म्हणाला की, ‘लीच हा हिंमतवान खेळाडू आहे. त्याच्याबाबत कुठलाही अंदाज व्यक्त करणे कठीण असते. पुढील काही दिवस तो कसा सराव करेल, याची प्रतीक्षा आहे.’ लीच न खेळल्यास त्याची जागा ऑफस्पिनर शोएब बशीर घेऊ शकतो. व्हीसाबाबत समस्या उद्भवल्यामुळे बशीरचे भारतात उशिरा आगमन झाले. तो पहिल्या कसोटीस मुकला होता. बशीरला संधी मिळाल्यास तो शानदार कामगिरी करू शकतो, असा विश्वास क्रॉलीने व्यक्त केला.
Web Title: Ind Vs England: If Virat was captain, India would not have lost, Rohit was not fully focused, claims Michael Vaughan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.