IND vs IRE 1st T20I - भारतीय संघाने जसप्रीत बुमराहाच्या नेतृत्वाखाली पहिली ट्वेंटी-२० मॅच DLS नुसार २ धावांनी जिंकली. आयर्लंडच्या १३९ धावांचा पाठलाग करताना भारताने ६.५ षटकांत २ बाद ४७ धावा केल्या होत्या. पावसामुळे खेळ थांबवावा लागला अन् डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघ २ धावांनी आघाडीवर होता. त्यामुळे टीम इंडियाला विजयी घोषित केले गेल अन् भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कर्णधार म्हणून जसप्रीतचा ट्वेंटी-२० सामन्यात पदार्पण होता आणि त्याने पहिलाच सामना जिंकून मोठा विक्रम नोंदवला.
आयर्लंडचा निम्मा संघ ३१ धावांवर तंबूत जाऊनही कर्टीस कॅम्फर ( ३९) व बॅरी मॅकार्थी यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून संघाला ७ बाद १३९ धावांपर्यंत मजल मारून दिली. जसप्रीत ( २-२४), रवी बिश्नोई ( २-२३) व प्रसिद्ध कृष्णा ( २-३२) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. मॅकार्थीने ३३ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार खेचून नाबाद ५१ धावा केल्या. त्याने संघाला ७ बाद १३९ धावांपर्यंत पोहोचवले. ऋतुराज गायकवाड ( १९*) व यशस्वी जैस्वाल ( २४) यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. तिलक वर्मा गोल्डन डकवर माघारी परतला.
कर्णधार म्हणून पहिलीच ट्वेंटी-२० जिंकणारा जसप्रीत हा आठवा भारतीय ठरला. यापूर्वी वीरेंद्र सेहवाग, महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शिखर धवन, हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांनी हा पराक्रम केला आहे. पण, कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात मॅन ऑफ दी मॅच जिंकणारा जसप्रीत पहिलाच भारतीय ठरला.