IND vs IRE 1st T20I - भारत-आयर्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेपेक्षा सर्वांना आतुरता आहे, ती जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याच्या पुनरागमनाची... ११ महिन्यानंतर 'लॉर्ड ऑफ स्विंग' बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला मैदानावर उतरणार आहे. दुखापतीमुळे त्याला आशिया चषक, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल... आदी महत्त्वांच्या स्पर्धांना मुकावे लागले होते. पण, आता तो वन डे वर्ल्ड कप पूर्वी पुनरागमन करत असल्याने भारतीय चाहते आतुरतेने त्याची वाट पाहत आहेत.
''प्रदीर्घ कालावधीनंतर मी पुनरागमन करत आहे आणि मला सध्या त्याचा आनंद घ्यायचा आहे. एवढा काळ मी कधीच खेळापासून दूर राहिलो नव्हतो. मी हे करेन, मी ते करेन किंवा मी असे योगदान देईन, याबाबत मी सध्या विचार करत नाही. मला आता क्रिकेटचा आनंद लुटायचा आहे,''असे काल कर्णधार जसप्रीत बुमराहने सांगितले. भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व करणारा तो पहिलाच जलदगती गोलंदाज ठरणार आहे. भारताचा तो ट्वेंटी-२० संघाचा ११वा कर्णधार आहे. दक्षिण आफ्रिका ( १५) आणि वेस्ट इंडिज ( १३) यांनी सर्वाधिक कर्णधार बनवले आहेत. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांनी ट्वेंटी-२०त ११ कर्णधार वापरून पाहिले.
सामन्यावर पावसाचे सावट...जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची प्रतीक्षा करत असलेल्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर येत आहे... आजच्या सामन्यात पाऊस व्यत्यय आणू शकतो.. सध्या डबलिन येथे पाऊस सुरू आहे आणि हा जोर असाच सुरू राहिला तर आजचा सामना रद्दही होऊ शकतो. अशात बुमराहचे पुनरागमन लांबणीवर पडू शकते. दुसरा ट्वेंटी-२० सामना २० ऑगस्टला होणार आहे.
भारताचा संभाव्य संघ - यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन/जितेश शर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर/शाहबाज अहमद, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.