वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर पोहोचला आहे. भारत आणि आयर्लंडच्या संघातील मालिकेतील पहिला सामना १८ ऑगस्ट रोजी डब्लिन येथे खेळवला जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. येथे विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला मेहनत करावी लागणार आहे. कारण मागच्या वेळी घरच्या मैदानावर आयर्लंडने आपण एक मजबूत संघ असल्याचे दाखवून दिले आहे. भारतीय संघानेही त्याचा अनुभव घेतलेला आहे.
आता यावेळच्या आयर्लंड दौऱ्यामध्ये आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिग हा भारतीय संघासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो. पॉल स्टर्लिंग हा शरीरयष्टीने स्थूल दिसत असला तरी त्याची फलंदाजी तेवढीच धडाकेबाज आहे. टी-२० मध्ये आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा जमवण्याचा विक्रम स्टर्लिंगच्या नावावर आहे. त्याशिवाय आपल्या संघासाठी सर्वाधिक अर्धशतके फटकावणाराही तो पहिला फलंदाज आहे.
पॉल स्टर्लिंग हा टी-२० मध्ये वेगाने धावा जमवण्यासाठी प्रसिद्ध आहे. टी-२० मध्ये त्याचा स्ट्राईक रेट हा १३६.२१ एवढा भन्नाट आहे. पॉल स्टर्लिंगने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १२९ सामने खेळले आहेत. यादरम्यान, त्याने १२८ डावंमध्ये २८.७९ च्या सरासरीने ३३९७ धावा फटकावल्या आहेत.
मात्र दिलासादायक बाब म्हणजे पॉल स्टर्लिंगची भारताविरुद्धची कामगिरी फारशी चांगली नाही. तो भारताविरोधात आतापर्यंत चार सामने खेळला आहे. त्यातील ४ डावांमध्ये ११.२५ च्या सरासरीने त्याला केवळ ४५ धावा काढता आल्या आहेत. भारताविरुद्ध त्याची सर्वोच्च धावसंख्या ही ४० राहिली आहे.