IND vs IRE 2nd T20I Live Marathi : भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक अन् संजू सॅमसन, रिंकू सिंग व शिवम दुबे यांच्या फटकेबाजीने भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराह ( २-१५) प्रसिद्ध कृष्णा ( २-२९) व रवी बिश्नोई ( २-३७) यांनी कमालीची गोलंदाजी केली. पण, अँडी बालबर्नीने ७२ धावांची खेळी करून भारतीयांची झोप उडवली होती. जसप्रीतने २०वे षटक निर्धाव टाकले.
आयर्लंडची सुरुवात खराब झाली. प्रसिद्ध कृष्णाने तिसऱ्या षटकात आयर्लंडच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवले. पॉल स्टर्लिंग ( ०) व लॉर्कन टकर ( ०) हे माघारी परतल्याने आयर्लंडची अवस्था २ बाद १९ अशी केली. रवी बिश्नोईने त्याच्या गुगलीची पुन्हा जादू दाखवली आणि हॅरी टेक्टरची ( ७) दांडी उडवली. कर्टीस कॅम्फर आणि अँडी बालबर्नी यांनी आयर्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु बिश्नोईने पुन्हा एकदा कमाल केली. कॅम्फर ( १८) शिवम दुबेच्या हाती झेल देऊन माघारी परतला. ( प्रसिद्ध कृष्णाच्या २ विकेट्स ) बालबर्नीने एक बाजू लावून धरताना ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. बालबर्नीचा सोपा झेल ऋतुराजने टाकला आणि त्यानेच भारतीय गोलंदाजांना चोपले.
बालबर्नीला साथ देणारा जॉर्ज डॉक्रेल ( १३) घाई केल्यामुळे आऊट झाला. बालबर्नी चांगली फटकेबाजी करत होता, परंतु अर्शदीप सिंगने त्याला चकवले. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर छेडछाड करणे बालबर्नीला महागात पडले अन् ते ५२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकार खेचून ७१ धावांवर झेलबाद झाला. या विकेटनंतर जसप्रीत बुमराहने आयर्लंडला आणखी एक धक्का देऊन बॅकफूटवर फेकले. अर्शदीपने या विकेटसह ट्वेंटी-२०त विकेट्सचे अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३३ सामन्यांत हा टप्पा गाठला अन् जसप्रीत बुमराहचा ( ४१) विक्रम मोडला. १९व्या षटकात प्रसिद्धचे सलग दोन चेंडू मार्क एडरने सीमापार पाठवले. आयर्लंडला ६ चेंडूंत ३८ धावा करायच्या होत्या. एडर १५ चेंडूंत २३ धावांवर बाद झाला अन् भारताने ३३ धावांनी सामना जिंकला. आयर्लंडला ८ बाद १५२ धावा करता आल्या.
तत्पूर्वी, यशस्वी जैस्वाल (१८) आणि तिलक वर्मा ( १) माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन व ऋतुराज गायकवाड यांनी दमदार फटकेबाजी केली. संजूने ४० धावा ( २६ चेंडू, ५ चौकार व १ षटकार) केल्या आणि त्याने ऋतुराजसह ४९ चेंडूंत ७१ धावांची भागीदारी केली. ऋतुराज ४३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५८ धावांवर झेलबाद झाला. रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी २८ चेंडूंत ५५ धावांची भागीदारी करून भारताला मोठा पल्ला गाठून दिला. रिंकूने २१ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३८ धावा चोपल्या, तर शिवम २२ धावांवर नाबाद राहिला आणि भारताने ५ बाद १८५ धावा केल्या.
Web Title: IND vs IRE 2nd T20I Live Marathi : INDIA WON THE T20I SERIES BY 2-0 AGAINST IRELAND.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.