IND vs IRE 2nd T20I Live Marathi : जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार २ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आयर्लंडने ५ बाद ३१ धावांवरून पुनरागमन करताना भारतासमोर १४० धावांचे लक्ष्य उभे केले होते. भारताच्या २ बाद ४७ धावा झालेल्या असताना मुसळधार पाऊस पडला अन् सामना थांबवावा लागला. DLS नुसार भारत विजयी ठरला. आज दुसरा सामना जिंकून भारत मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात आहे.
आय़र्लंडच्या मॅकार्थी व कॅम्फर यांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती आणि त्यांना रोखण्याचे आव्हान आज भारतासमोर असेल. त्यामुळे कर्णधार बुमराह संघात काय बदल करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. बुमराहने आजच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही. पहिल्या सामन्यात बुमराहने दोन विकेट्स घेतलेल्या आणि त्याला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार मिळाला होता. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला.