IND vs IRE 3rd T20I Live Marathi : भारत-आयर्लंड यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात पावसाने खोडा घातल्याचे पाहायला मिळाले. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर हजारोंच्या संख्येने चाहते उपस्थित होते, परंतु पावसाने सर्वांचा हिरमोड केला. तीन तासानंतर पावसाने विश्रांती घेतली अन् खेळाडू मैदानावर सरावासाठी आले. त्यानंतर पंचांनी खेळपट्टीसह मैदानाची पाहणी केली अन् अखेर साडेतीन तासानंतर महत्त्वाचे अपडेट्स हाती लागले आहेत.
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आयर्लंडविरुद्धच्या आजच्या तिसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बेंच स्ट्रेंथमधील खेळाडूंना संधी मिळण्याची अपेक्षा होती. या लढतीपूर्वी भारतीय संघाने Chandrayaan 3 च्या यशाचे सेलिब्रेशन केले. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता टॉस होणं अपेक्षित होतं, परंतु जवळपास साडेतीन तास होत आले तरी सामना सुरू झालेला नाही.
दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांची दमदार फटकेबाजी पाहायला मिळाली होती. गोलंदाजीतही जसप्रीतसह इतरांनीही छाप पाडली. पण, आजच्या सामन्यात जितेश शर्माला पदार्पणाची, तर आवेश खान व शाहबाज अहमद यांना संधी देण्याची इच्छा सर्वांनी व्यक्त केली होती. पण, पावसामुळे ना टॉस झाला ना सामना सुरू झाला आहे. ९.१५ वाजल्यानंतर षटकं कमी होत जाणार होती आणि अखेर १०.३० वाजता बीसीसीआयने हा सामना रद्द होत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे भारताला २-० असा मालिकेत विजय मिळाला.