Team India, IND vs IRE । नवी दिल्ली : आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला असून जसप्रीत बुमरासह काही युवा खेळाडूंची टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. भारतीय संघ १८ ऑगस्टपासून आयर्लंडविरूद्ध तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. मागील वर्षभरापासून दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर ऋतुराज गायकवाडकडे उप कर्णधारपद देण्यात आले आहे. आयपीएलचा सोळावा हंगाम गाजवणाऱ्या रिंकू सिंगची देखील आगामी मालिकेसाठी भारतीय संघात वर्णी लागली आहे.
दरम्यान, भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर युवा रिंकू सिंग भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात रिंकूने एकाच षटकात ५ षटकार ठोकून प्रसिद्धी मिळवली. गुजरातच्या तोंडचा घास पळवून रिंकूने केकेआरला विजय मिळवून दिला अन् युवा खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात आला.
भारतीय संघात संधी मिळताच रिंकू भावुक भारतीय संघात निवड झाली असल्याची भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नसल्याचे रिंकूने म्हटले. "भारतीय संघात स्थान मिळाले ही एक मोठी बाब आहे, ज्याचे शब्दांत वर्णन करणे माझ्यासाठी सोपे नाही. मी आज इथपर्यंत पोहचलो आहे, मी एक भावनिक व्यक्ती आहे आणि प्रत्येक वेळी मी माझ्या पालकांशी बोलत असतो. तेव्हा मला अचानक रडू कोसळते", असे रिंकूने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटले.
१८ तारखेपासून थरार भारतीय संघ १८ ऑगस्टपासून आयर्लंडविरूद्ध तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. १८, २० आणि २३ या दिवशी हे तीन सामने खेळवले जातील. तिन्ही सामने डब्लिनच्या द व्हिलेज स्टेडियमवर खेळवले जातील. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने आशिया चषक आणि भारतात होणारा वन डे विश्वचषक पाहता या ट्वेंटी-२० मालिकेत काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे आयपीएल गाजवणाऱ्या युवा शिलेदारांना टीम इंडियात संधी मिळाली आहे.
आयर्लंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारताचा संघ - जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.