jasprit bumrah news : भारतीय संघ आगामी काळात आयर्लंडविरूद्ध तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेतून जसप्रीत बुमराह पुनरागमन करत असून त्याच्या नेतृत्वातच टीम इंडिया आयर्लंडशी भिडणार आहे. याशिवाय कोचिंग स्टाफमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. खरं तर भारतीय संघाचे नियमित प्रशिक्षक राहुल द्रविडऐवजी व्हीव्हीएस लक्ष्मण आयर्लंड दौऱ्यावर प्रशिक्षक असतील, असे मानले जात होते. परंतु, या दोघांनाही विश्रांती देण्यात आली असून आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून सितांशू कोटक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, आयर्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी अचानक प्रशिक्षक बदलण्यात आल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या इमर्जिंग कॅम्पचा हिस्सा असणार आहेत. यादरम्यान ते युवा खेळाडूंची क्षमता तपासण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे एका नव्या चेहऱ्याला प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. १८ ऑगस्टपासून भारत आणि आयर्लंड यांच्यातील मालिकेला सुरूवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाचे नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड आणि उर्वरित कोचिंग स्टाफ संघासोबत नसतील. या सर्वांना विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, आशिया चषकासाठी राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळतील.
कोण आहेत सितांशू कोटक?सितांशू कोटक हे भारत अ संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत. याशिवाय ते बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजी प्रशिक्षक आहेत. आयर्लंड दौऱ्यावर सितांशू कोटक यांच्याशिवाय साईराज बहुतुले भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक असतील. मंगळवारी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासोबत सितांशू कोटक, साईराज बहुतुले आगामी मालिकेसाठी रवाना होतील.
आयर्लंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारताचा संघ - जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.