बंगळुरू : बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर नवख्या नेदरलँड्सला नमवून भारताने इतिहास रचला. विश्वचषकात प्रथमच भारतीय संघाला साखळी फेरीतील सर्व सामने जिंकण्यात यश आले. सांघिक खेळीच्या जोरावर यजमान संघाने माजी विश्वविजेत्यांना पराभवाची धूळ चारली. सामन्यानंतर नेहमीप्रमाणे भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये बेस्ट फिल्डर कोण हे पाहण्यासाठी खेळाडूंमध्ये उत्सुकता दिसली. पण यावेळी बीसीसीआय आणि प्रशिक्षकांनी एक वेगळा प्रयोग केला अन् चांगला क्षेत्ररक्षक कोण हे जाहीर करण्याची संधी ग्राऊंड स्टाफला दिली.
ग्राऊंड स्टाफच्या कर्मचाऱ्यांनी बेस्ट फिल्डर म्हणून सूर्यकुमार यादवच्या नावावर शिक्कामोर्तब करताच भारतीय खेळाडूंनी एकच जल्लोष केला. सूर्यकुमारला प्रशिक्षक नुवान सेनेविरत्ने यांच्याकडून पदक देण्यात आले आणि भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी सूर्याचे कौतुक केले. दरम्यान, भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला असून बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात फायनलचे तिकिट मिळवण्यासाठी लढत होणार आहे.
भारताचा सलग नववा विजय
नेदरलँड्सविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ गडी गमावून ४१० धावांची विशाल धावसंख्या उभारली. श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी शतकी खेळी करून भारताच्या नवव्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अय्यरने नाबाद १२८ धावा केल्या तर राहुलने १०२ धावांचे योगदान दिले. ४११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ २५० धावांत आटोपला. स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वातील नेदरलँड्सला यंदाच्या विश्वचषकात ९ सामन्यांमध्ये २ विजय मिळवता आले. पण, नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारून क्रिकेट विश्वाला धक्का दिला. त्यांनी आफ्रिकेला ३८ तर बांगलादेशला ८७ धावांनी पराभूत केले.
Web Title: IND vs NED Suryakumar Yadav awarded fielder of the match with help from groundsmen, watch here video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.