India vs Netherlands , T20 World Cup : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याला अखेर आज सूर गवसला. महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी रोहितच्या फॉर्म बाबत चिंता व्यक्त केली होती. पण, नेदरलँड्सविरुद्ध त्याने अर्धशतक झळकावले. दोन झेल सुटल्यानंतर रोहितने फटकेबाजी केली आणि अनेक विक्रमांची नोंद केली. विराट कोहलीने ( Virat Kohli) सलग दुसरे अर्धशतक पूर्ण करताना नेदरलँड्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि त्यात सूर्यकुमार यादवनेही हात धुतले.
लोकेश राहुल (९) पॉल व्हॅन मीकेरेनच्या गोलंदाजीवर LBW झाला. रोहितही सुरुवातीला अडखळला. त्याचे दोन झेल सुटले. नेदरलँड्सला ही चूक महागात पडली आणि रोहितने अर्धशतक झळकावले. त्याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक ३४ सिक्स मारण्याचा विक्रम नावावर केला. युवराज सिंगचा ३३ षटकारांचा विक्रम रोहितने मोडला. आयसीसी स्पर्धांमध्ये रोहितचे हे २३ वी ५०+ खेळी ठरली. विराट कोहली ( २४) व सचिन तेंडुलकर ( २३) हे आघाडीवर आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहितने ( ९) ख्रिस गेलशी बरोबरी केली, या विक्रमात विराट ( ११) अव्वल स्थानावर आहे. रोहित ३९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा करून बाद झाला. विराटसह त्याने ५६ चेंडूंत ७३ धावांची भागीदारी केली.
विराट व सूर्यकुमार यादव यांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. नेदरलँड्सचे गोलंदाज व क्षेत्ररक्षक भारताच्या धावा रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसले. त्यांच्या या प्रयत्नांना प्रेक्षकांकडूनही दाद मिळाली. भारताने पहिल्या ६ षटकांत ५.३च्या सरासरीने धावा केल्या. त्यानंतर ७-१० षटकांत ६.१ आणि ११ -१५ षटकांत १०.२ च्या सरासरीने धावा चोपून वेग वाढवला. विराटने ३७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप इतिहासाता सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत दुसऱ्या स्थानी पोहोचला. नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत चांगली गोलंदाजी केली. विराट ४४ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ६२ धावांवर नाबाद राहिला , तर सूर्यकुमारने २५ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ५१ धावा केल्या.. भारताने २ बाद १७९ धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs NED, T20 World Cup : India posted 175 for 2 from 20 overs with fifties from Virat Kohli, Rohit Sharma & Suryakumar Yadav
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.