India vs Netherlands , T20 World Cup : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याला अखेर आज सूर गवसला. महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी रोहितच्या फॉर्म बाबत चिंता व्यक्त केली होती. पण, नेदरलँड्सविरुद्ध त्याने अर्धशतक झळकावले. दोन झेल सुटल्यानंतर रोहितने फटकेबाजी केली आणि अनेक विक्रमांची नोंद केली.
भारत आणि नेदरलँड्स यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना सिडनी येथे होत आहे. ऑरेंज आर्मीने तिसऱ्याच षटकात भारताला अनपेक्षित धक्का दिला. लोकेश राहुल (९) पॉल व्हॅन मीकेरेनच्या गोलंदाजीवर LBW झाला. लोकेशने DRS घेऊ का यासाठी रोहित शर्माला विचारणा केली, परंतु त्याने नकार दिला. लोकेशने DRS घेतला असता तर त्याची विकेट वाचली असती, कारण चेंडू यष्टींच्या बाजूने जात असल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट दिसले. रोहितही सुरुवातीला अडखळला.. त्याचे दोन झेल सुटले. नेदरलँड्सला ही चूक महागात पडली आणि रोहितने मोठा विक्रम नोंदवला. त्याने या सामन्यात दुसरा षटकार खेचून ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक ३४ सिक्स मारण्याचा विक्रम नावावर केला. युवराज सिंगचा ३३ षटकारांचा विक्रम रोहितने मोडला. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक ६३ षटकार आहेत.
रोहितने ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आयसीसी स्पर्धांमध्ये रोहितचे हे २३ वी ५०+ खेळी ठरली. विराट कोहली ( २४) व सचिन तेंडुलकर ( २३) हे आघाडीवर आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहितने ( ९) ख्रिस गेलशी बरोबरी केली, या विक्रमात विराट ( ११) अव्वल स्थानावर आहे. रोहित ३९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा करून बाद झाला. विराटसह त्याने ५६ चेंडूंत ७३ धावांची भागीदारी केली.