India vs Netherlands , T20 World Cup : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. पाकिस्ताननंतर टीम इंडियाने नेदरलँड्सवर सहज विजय मिळवला. रोहित शर्माला गवसलेला सूर ही या सामन्यातील सकारात्मक बाब ठरली. रोहितसह विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकी खेळी केली. भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग व आर अश्विन यांनी गोलंदाजीत कमाल दाखवली. या सामन्यात प्रेक्षकांमध्ये लग्नाची बोलणी झाल्याचे दिसले. एका युवकाने गुडघ्यावर बसून प्रेयसीला लग्नाची मागणी घातली, पण...
भारत दोन विजयांसह टेबल टॉपर झाला, नेदरलँड्स हरल्याने पाकिस्तानला घाम फुटला!
लोकेश राहुल (९) पॉल व्हॅन मीकेरेनच्या गोलंदाजीवर LBW झाला. रोहित शर्माने ३९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या आणि विराटसह त्याने ५६ चेंडूंत ७३ धावांची भागीदारी केली. विराट व सूर्यकुमार यादव यांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आणि ४८ चेंडूंत नाबाद ९५ धावांची भागीदारी केली. विराट ४४ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ६२ धावांवर नाबाद राहिला , तर सूर्यकुमारने २५ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ५१ धावा केल्या. भारताने २ बाद १७९ धावा केल्या. भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पहिली दोन षटक निर्धाव फेकून एक विकेट घेतली.
अक्षर पटेल व आर अश्विन यांनी नेदरलँड्सला डोकं वर काढू दिलं नाही. अक्षरने ४ षटकांत १८ धावा देत २ विकेट्स घेतल्या. अश्विनने ४ षटकांत २१ धावांवर २ विकेट्स घेतल्या. भुवी ( २-९), अर्शदीप सिंग ( २-३७) व मोहम्मद शमी ( १-२७) यांनी अखेरच्या षटकांत धक्कातंत्र कायम राखले आणि भारताचा विजय पक्का केला. नेदरलँड्सचा ९ बाद १२३ धावा करता आल्या आणि भारताने ५६ धावांनी सामना जिंकला. दरम्यान, या सामन्यात प्रियकराने त्याच्या प्रेयसीला लग्नाची मागणी घातली आणि तिने होकार दिला.
पाहा व्हिडीओ..
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"