India vs Netherlands , T20 World Cup : भारत आणि नेदरलँड्स यांच्यात पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना वर्ल्ड कप स्पर्धेत आज सिडनी येथे रंगणार आहे. पण, काल मेलबर्नवर झालेल्या सामन्यांत पावसामुळे इंग्लंड व न्यूझीलंड यांना खूप मोठा फटका बसला. इंग्लंडला ५ धावा कमी पडल्याने आयर्लंडकडून DLS नुसार हार मानावी लागली, तर न्यूझीलंडला अफगाणिस्तानसोबत १-१ गुण वाटून घ्यावे लागले. भारताच्या ग्रुप २ मध्येही दक्षिण आफ्रिकेला झिम्बाब्वेविरुद्ध एका गुणावर समाधान मानावे लागले. त्यात सिडनी येथे होणाऱ्या भारत-नेदरलँड्स लढतीवर पावसाचे सावट आहे. ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप कव्हर करायला गेलेल्या पत्रकारांच्या मते येथील हवामान लहरी आहे आणि तासातासाला त्याचे रंग पाहायला मिळत आहेत.
भारताने पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. ग्रुप २ मध्ये बांगलादेशनेही विजयाची नोंद करून सरस नेट रन रेटच्या जोरावर अव्वल स्थान पटकावले आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातला सामना पावसामुळेच अनिर्णित राहिला आणि दोघांना एकेक गुण मिळाले. आफ्रिकेच्या या निकालामुळे पाकिस्तानचे उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. आता भारत-नेदरलँड्स मॅच पावसामुळे रद्द होणार असे संकेत मिळाल्याने पाकिस्तानच्या ताफ्यातील आनंद द्विगुणित झाला असेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"