सिडनी - टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. आज सिडनीमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात भारताने नेदरलँड्सला ५६ धावांनी पराभूत केले. भारतीय संघाने नेदरलँड्ससमोर विजयासाठी १८० धावांचे आव्हान ठेवले होते. त्याच्या प्रत्युत्तरदाखल नेदरलँड्सचा संघ २० षटकांमध्ये नऊ विकेट्सच्या मोबदल्यात केवळ १२३ धावाच जमवू शकला. भारतीय संघाच्या विजयात फलंदाजांचं योगदान बहुमूल्य असं होतं. मात्र आजच्या दणदणीत विजयानंतरही भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा नाराज दिसून आला. त्यामागच्या कारणाचाही त्याने खुलासा केला.
नेदरलँडवर विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं. मात्र अर्धशतकी खेळी केल्यानंतरही तो आपल्या फलंदाजीबाबत काहीसा नाराज दिसून आला. त्याने नेदरलँड्सच्या संघाचंही कौतुक केलं. सुपर-१२ फेरीसाठी पात्र ठरणे हे डच टीमसाठी मोठं यश आहे, त्याचं श्रेय त्यांना दिलं पाहिजे, असे तो म्हणाला.
रोहित शर्मा पुढे म्हणाला की, मी ज्याप्रकारे फलंदाजी केली त्यावर मी पूर्णपणे समाधानी नाही आहे. ही माझी उत्तम खेळी होती असं मी म्हणणार नाही. काही धावा जमवणे हे माझ्यासाठी चांगले राहिले. धावा होत राहिल्या पाहिजेत. मग त्या चांगल्या वाटोत वा न वाटोत, त्याने काही फरक पडत नाही. तो आत्मविश्वास कायम ठेवणे महत्त्वपूर्ण आहे. ज्या प्रकारे नेदरलँड्सने सुपर १२ साठी क्वालिफाय केलं आहे, त्याचं श्रेय त्यांना दिलं पाहिजे.
भारतीय संघाचा सध्याच्या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. त्यापूर्वी भारतीय संघाने पाकिस्तानला चार विकेट्सनी पराभूत केले होते. दरम्यान, सलग दोन विजयांसह भारतीय संघ ग्रुप २ च्या पॉईंट टेबलमध्ये दक्षिण आफ्रिकेला मागे टाकले आहे. आता भारतीय संघाचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.