Join us  

IND Vs NZ, 1st ODI : भारताच्या त्रिकुटानं धू धू धुतलं, टीम इंडियानं 'डोंगरा' एवढं आव्हान उभं केलं!

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं सलामीला नवी जोडी खेळवण्याचा डाव खेळला. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी एकाच सामन्यात पदार्पण करताना संघाला अर्धशतकी सलामीही करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 11:19 AM

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं सलामीला नवी जोडी खेळवण्याचा डाव खेळला. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी एकाच सामन्यात पदार्पण करताना संघाला अर्धशतकी सलामीही करून दिली. पण, या दोघांनाही मोठी खेळी साकारण्यात अयपश आलं. कोहलीनं श्रेयस अय्यरसोबत आणि श्रेयसनं लोकेश राहुलसोबत अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना टीम इंडियाला मोठी मजल मारून दिली. त्या जोरावर भारतानं यजमानांसमोर तगडं आव्हान उभं केलं. किवींचा सर्वात यशस्वी गोलंदाज टीम साउदीच्या ( 2 विकेट्स) 10 षटकांत टीम इंडियानं 85 धावा चोपून काढल्या.

वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल या भारतीय सलामीवीरांनी साजेशी सुरुवात केली. दोघांनी आठ षटकांत अर्धशतकीय भागीदारी केली. पण, आठव्या षटकातील अखेरच्या चेंडूनं ही जोडी तोडली. कॉलीन डी ग्रँडहोमनं पृथ्वीला ( 20) यष्टिरक्षक टॉम लॅथम करवी झेलबाद करून माघारी पाठवले. पुढच्याच षटकात मयांकही माघारी परतला. टीम साउदीच्या गोलंदाजीवर पॉईंटवर उभ्या असलेल्या टॉम ब्लंडेल यानं अप्रतिम झेल टीपत मयांकला ( 32) तंबूत जाण्यास भाग पाडले. 

कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. अय्यरला नशीबानं साथ दिली हेही तितकंच खरं. त्याचे दोन झेल किवी फलंदाजांनी सोडले. त्यानंतर श्रेयसने बचावात्मक खेळ केला आणि कोहली दुसऱ्या बाजूनं फटकेबाजी करत होता. या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघाची सरासरी सहाच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न केला. विराटनं वन डेतील 58 वे अर्धशतक पूर्ण करताना भारताला मोठ्या आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. विराटनं 61 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. यासह विराटनं तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही पूर्ण केली. 

विराट अन् श्रेयसची 102 धावांची भागीदारी इश सोढीनं सुंपष्टात आणली. 29व्या षटकातील चौथा चेंडू मॅजिकल ठरला. सोढीनं टाकलेल्या त्या चेंडूनं विराटच्या बॅट-पॅडमधून वाट काढत यष्टिंचा वेध घेतला. विराटही काही काळ हतबल झालेला पाहायला मिळाला. तो 63 चेंडूंत 6 चौकारांसह 51 धावा करून तंबूत परतला. खेळपट्टीवर तग धरलेल्या श्रेयसनेही अर्धशतक पूर्ण केले. वन डे क्रिकेटमधील त्यानं 7वे वैयक्तिक अर्धशतक झळकावताना संघाला मजबूत स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला. श्रेयसनं काही उत्तुंग षटकारही खेचले. त्यानं चौथ्या विकेटसाठी लोकेश राहुलसह अर्धशतकी भागीदारी केली आणि संघाला दोनशे धावांचा पल्ला पार करून दिला. 

खेळपट्टीवर स्थावरल्यानंतर लोकेशनंही आपला इंगा दाखवला. त्यानं टीम साउदीच्या एकाच षटकात लागोपाठ दोन खणखणीत षटकार खेचले. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये श्रेयस आणि लोकेशनं तुफान फटकेबाजी केली. 84 धावांवर असताना श्रेयसचा झेल सोडण्याची चुक कॉलीन डी ग्रँडहोमनं केली. श्रेयस आणि लोकेश यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं कूच करून दिली.  श्रेयसनं वन डे कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावले. त्याला लोकेशची तोडीसतोड साथ मिळाली. या दोघांची चौथ्या विकेटसाठी  136 धावांची भागीदारी टीम साउदीनं संपुष्टात आणली. 

श्रेयस 107 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकार खेचून 103 धावांवर मिचेल सँटनरच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतर लोकेश व केदार जाधवनं फटकेबाजी केली. भारतानं 50 षटकांत 4 बाद 347 धावांचा डोंगर उभा केला. लोकेश 64 चेंडूंत  3 चौकार व 6 षटकारांसह 88 धावांवर नाबाद राहिला. 

11 वर्षांनंतर भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडमध्ये घडवला इतिहास, हा विक्रम आहे खास

पृथ्वी शॉ-मयांक अग्रवाल जोडीनं 1976नंतर न्यूझीलंडमध्ये घडवला पराक्रम

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडलोकेश राहुलविराट कोहली