India vs New Zealand 1st ODI Playing XI : भारतीय संघाने २०२३ ची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयाने केली. यंदाच्या वर्षात भारतात वन डे वर्ल्ड कप होणार आहे आणि त्याच्या तयारीसाठी आता प्रत्येक वन डे मालिका महत्त्वाची आहे. विराट कोहलीचा परतलेला फॉर्म अन् शुभमन गिलची सातत्यपूर्ण कामगिरी ही भारतीय संघासाठी जमेची बाब आहे. रोहित शर्माला मात्र मागील ५० डावांत शतक झळकावता आलेले नाही, यामुळे चाहते चिंतीत आहेत. लोकेश राहुलकडे यष्टिरक्षक-फलंदाजाची जबाबदारी सोपवण्यात आलेली असल्याने भारत एक अतिरिक्त फलंदाज किंवा अष्टपैलू खेळाडू खेळवू शकतो. पण उद्यापासून सुरू होत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत केएल राहुल नाही आणि रोहितची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे. केएल राहुलच्या अनुपस्थितीत इशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे, पण तो कोणत्या क्रमांकावर खेळेल हा खरा मुद्दा आहे.
भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील फलंदाजावर गुन्हा दाखल; शिंदे गटातील नेत्याचा जावई अडचणीत
रोहित शर्मा व शुभमन गिल यांची जोडी चांगली जमलेली दिसतेय अन् अशात इशानला ओपनिंगला खेळवून ही लय अजिबात बिघडवण्याचा रोहित विचार करणार नाही. सूर्यकुमार यादव पुन्हा पाहुण्यासारखा येऊन बाकावर बसण्याची शक्यता अधिक आहे. ट्वेंटी-२०त सूर्याला तोड नसली तरी वन डे क्रिकेटमध्ये त्याच्यासमोर जिगरी मित्र श्रेयस अय्यरचे आव्हान आहे. वन डे क्रिकेटसाठी टीम इंडिया श्रेयसला प्राधान्य देण्याच्या मानसिकतेत आहे. आणखी एक संकट अन् ते म्हणजे युझवेंद्र चहल की कुलदीप यादव? कुलदीपने मागील सामन्यात चांगली कामगिरी केली होती आणि त्याला बाकावर बसवल्यास पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. वॉशिंग्टन सुंदर हाही शर्यतीत आहे.
लोकेशच्या अनुपस्थित इशान यष्टिंमागे दिसेल, परंतु त्याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला यावे लागेल. बांगलादेशविरुद्धच्या वन डे सामन्यात इशानने जलद द्विशतक झळकावण्याचा विक्रम केला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे संघात भारताने केएस भरतचाही समावेश केला आहे आणि तो इशानसमोरील स्पर्धक आहे. पण, भरतला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे. फिरकीपटूंमध्ये चहल व यादव यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. चहलला दुखापत झाल्याने कुलदीपची एन्ट्री झाली होत आणि त्याने कमाल केली. त्यामुळे त्याला बाहेर काढणं हा त्याच्यावर अन्याय ठरू शकतो.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
भारताचा वन डे संघ ( वि. न्यूझीलंड) - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत ( यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"