India vs New Zealand 1st ODI Live : शिखर धवन, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या वन डे सामन्यात न्यूझीलंडसमोर ३०७ धावांचे लक्ष्य उभे केले. संजू सॅमसन व वॉशिंग्टन सुंदर यांनी फटकेबाजी करताना उपयुक्त धावा जोडल्या. आजच्या सामन्यात उम्रान मलिक आणि अर्शदीप सिंग या युवा गोलंदाजांनी पदार्पण केले आणि त्यांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा आहेत. जम्मू-काश्मीरच एक्स्प्रेस उम्रानने ( Umran Malik) आज किवी फलंदाजांना आपल्या वेगाने भांबावून सोडले. आजच्या सामन्यातील सर्वात वेगवान चेंडू उम्रानने फेकला.
शिखर धवन ( ७२) आणि शुबमन गिल ( ५०) या जोडीनं भारताला दमदार सुरुवात करून देताना १२४ धावांची भागीदारी केली, परंतु न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ९ चेंडूंच्या फरकाने दोघांनाही माघारी पाठवले. त्यानंतर रिषभ पंत (१५) व सूर्यकुमार यादव ( ४) हेही अपयशी ठरले आणि भारताची धावगती मंदावली. श्रेयस अय्यर ( ८०) व संजू सॅमसन ( ३६) यांनी ७७ चेंडूंत ९४ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. दुखापतीतून कमबॅक केलेल्या वॉशिंग्टन सुंदरने ( Washington Sundar ) सर्वांची वाहवाह मिळवली. त्याने १६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारासह नाबाद ३७ धावा केल्या. भारताने ७ बाद ३०६ धावा उभ्या केल्या.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडने सावध खेळ केला. फिन अॅलन व डव्हॉन कॉनवे ही जोडी विकेट टिकवून खेळत होती. त्यात युजवेंद्र चहलने फिनला जीवदान दिले, परंतु शार्दूल ठाकूरने त्याच षटकात फिनला ( २२) माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानतर उम्रान मलिकने कमाल केली. वेगवान मारा करताना त्याने किवी फलंदाजांची बोलती बंद केलीच, शिवाय दोन धक्के देत दडपणही निर्माण केले. उम्रानने किवींचा सलामीवीर कॉनवे ( २४) आणि डॅरील मिचेल ( ११) यांची विकेट घेतली. त्याने आजच्या सामन्यात १५३kmph वेगवान चेंडू टाकला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"