India vs New Zealand, 1st ODI Live : शुभमन गिलने ( Shubman Gill) आज रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी केली. त्याने १४९ चेंडूंत १९ चौकार व ९ षटकारांसह २०८ धावांची खेळी केली आणि भारताची धावसंख्या ३४९ धावांपर्यंत पोहोचवली. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे ६ फलंदाज १३१ धावांवर माघारी परतल्यानंतर भारत सहज विजय मिळवेल असाच अंदाज होता. पण, मायकेल ब्रेसवेल व मिचेल सँटनर यांनी १०२ चेंडूंत १६२ धावांची विक्रमी भागीदारी करताना यजमानांना अखेरपर्यंत टक्कर दिली. ब्रेसवेलने विक्रमी शतक झळकावले, तर सँटनर अर्धशतक झळकावून माघारी परतला. मोहम्मद सिराजने मोक्याच्या क्षणी ही भागीदारी तोडली अन् सामन्यात रंगत आणली. हार्दिक पांड्याने ४९ व्या षटकात ४ धावा देत भारताला विजयाचे स्वप्न दाखवले अन् शार्दूलने अखेरच्या षटकात ब्रेसवेलची विकेट घेत थरारक विजय पक्का केला.
रोहित ( ३८) व शुभमन ही जोडी सलामीला आली अन् पुन्हा एकदा रोहितला मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहली ( ८) व इशान किशन ( ५) हे स्वस्तात माघारी परतले. सूर्यकुमार यादव ( ३१) व शुभमन यांनी भारताचा डाव सावरताना ५२ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली. शुभमन गिलला दोन जीवदान मिळाले अन् न्यूझीलंडला ते महागात पडले. भारताने ८ बाद ३४९ धावांचा डोंगर उभा केला. इशान किशनने २४ वर्ष व १४५ दिवसांचा असताना द्विशतक झळकावले होते, शुभमनने २३ वर्ष व १३२ वर्षांचा असताना हा पराक्रम करून द्विशतक झळकावणाऱ्या युवा फलंदाजाचा मान पटकावला. भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला. रोहित शर्माने तीन द्विशतकं झळकावली आहेत. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग व इशान किशन यांनीही द्विशतकी खेळी केली आहे.
तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना किवींकडून सावधच खेळ होताना दिसला. फिन अॅलन व डेव्हॉन कॉनवे हे सावध खेळ करताना दिसले, परंतु प्रथमच घरच्या मैदानावर आंततरराष्ट्रीय वन डे सामना खेळणाऱ्या
मोहम्मद सिराजने भारताला विकेट मिळवून दिली. कॉनवे ( १०) धावांवर बाद झाला. सिराजला प्रत्यक्ष खेळताना पाहण्यासाठी त्याचे कुटुंबीय स्टेडियममध्ये उपस्थित होते. हेन्री निकोल्स ( १८) व डॅरील मिचेल ( ९) यांना कुलदीप यादवने बाद केले. फिनला ४० धावांवर शार्दूल ठाकूरने माघारी पाठवले, शाहबाज अहमदने सुरेख झेल टिपला. मोहम्मद शमीने किवींचा पाचवा फलंदाज माघारी पाठवला. ग्लेन फिलिप्स ( ११) माघारी परतल्याने पाहुण्यांची अवस्था ५ बाद ११० अशी झाली.
किवींची खिंड लढवणाऱ्या टॉम लॅथमला ( २४) सिराजने माघारी पाठवून मोठा धक्का दिला. मायकल ब्रेसवेल व मिचेल सँटनर यांनी ३७ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण करताना संघर्ष सुरू ठेवला. ब्रेसवेलने ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ब्रेसवेल भारतीय गोलंदाजांना काही जुमानत नव्हता. त्याने ५७ चेंडूंत शतक पूर्ण करताना भारतीयांचे टेंशन वाढवले. ७ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर वन डे क्रिकेटमध्ये दोन द्विशतकं झळकावणारा ब्रेसवेल हा पहिला फलंदाज ठरला. सँटनरनेही ४१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना ब्रेसवेलला चांगली साथ दिली. या दोघांनी सामना ३० चेंडू ५९ धावा असा अटीतटीचा आणला. सिराजने पुन्हा कमाल केली. त्याने सँटनरला ( ५७) बाद करून ब्रेसवेलसह १०२ चेंडूंत १६२ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर आलेल्या हेन्री शिप्लीला ( ०) मागे पाठवून सिराजने सामना फिरवला.
ब्रेसवेल खिंड लढवत होता अन् रोहितची डोकेदुखी वाढलेली दिसत होती. १८ चेंडूंत ४१ धावा या अशक्य नव्हत्या, परंतु किवींकडे दोनच विकेट शिल्लक होत्या. मोहम्मद शमीच्या त्या षटकात १७ धावा चोपल्या अन् आता १२ चेंडू २४ धावा असा सामना आला. मोहम्मद सिराजने १० षटकांत ४६ धावांत ४ विकेट्स घेतल्या. ४९ वे षटक हार्दिकने टाकले आणि त्याने फर्ग्युसनला ( ८) बाद करून सामन्यातला थरार कायम राखला. पांड्याने त्या षटकात ४ धावा देत १ विकेट घेतली आणि त्यामुळे किवींना अखेरच्या षटकात २० धावा करायच्या होत्या. ब्रेसवेलने स्वतःकडे स्ट्राईक राखली. शार्दूल ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर ब्रेसवेलने षटकार खेचला. शार्दूलने तिसऱ्या चेंडूवर ब्रेसवेलला LBW केले अन् भारताचा विजय पक्का केला. ब्रेसवेल ७७ चेंडूंत १२ चौकार व १० षटकारांसह १४० धावांवर माघारी परतला. न्यूझीलंडला ३३७ धावा करता आल्या. भारताने १२ धावांनी सामना जिंकला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs NZ, 1st ODI Live : India have defeated New Zealand by 12 runs, Michael Bracewell scored 140 in just 78 balls with 12 fours and 10 sixes. Came when New Zealand were 110/5, soon 131/6.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.