India vs New Zealand, 1st ODI Live : भारत-न्यूझीलंड यांच्यातला पहिला वन डे सामना आज हैदराबाद येथे होत आहे. ३ वर्ष, १० महिने व १६ दिवसांनी हैदराबाद येथे वन डे क्रिकेट होत असल्याने स्टेडियम हाऊस फुल पाहायला मिळत आहे. तिकीटांची ब्लॅकने विक्री सुरू आहे. श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत नंबर वन असलेल्या न्यूझीलंडचा सामना करणार आहे. या मालिकेत विजय मिळवून भारताला नंबर वन बनण्याची संधी आहे. पण, मालिकेआधीच श्रेयस अय्यरला पाठीच्या दुखण्यामुळे माघार घ्यावी लागली आहे. अशात सूर्यकुमार यादवचा प्लेइंग इलेव्हनचा मार्ग मोकळा झाला आहे. तरीही रोहित शर्मा आज कोणती प्लेइंग इलेव्हन उतरवतो याची उत्सुकता आहेच.
रोहित शर्मा व शुभमन गिल ही जोडी सलामीला कायम राहणार आहे. लोकेश राहुलच्या अनुपस्थिती इशान किशन यष्टिंमागे दिसेल हे रोहितने कालच स्पष्ट केले. तो मधल्या फळीत खेळेल. विराट कोहलीचा फॉर्म हा किवी गोलंदाजांची चिंता वाढवणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याने सलग दोन शतकं झळकावली आहेत आणि आज त्याला शतकाची हॅटट्रीक साजरी करण्याची संधी आहे. सूर्यकुमार यादवला तिसऱ्या वन डेत फार काही करता आले नाही, परंतु श्रेयसच्या अनुपस्थितीत त्याला जबरदस्त खेळी करण्याची संधी मिळाली आहे. गोलंदाजीत मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी यांनी चांगले वर्चस्व राखले आहे.
न्यूझीलंडचा संघ केन विलियम्सन व टीम साऊदी यांच्याशिवाय भारतात दाखल झाला आहे. पण, त्यांनी पाकिस्तान दौऱ्यावर वन डे मालिका जिंकत आत्मविश्वास कमावला आहे आणि तिच कामगिरी येथे कायम राखण्याचा किवींचा प्रयत्न असणार आहे. टॉम लॅथम या दौऱ्यावर किवींचे नेतृत्व करणार आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, इशान किशन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"