India vs New Zealand 1st ODI Live : भारताच्या ३०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात निराशाजनक झाली. पण, अनुभवी कर्णधार केन विलियम्सन व टॉम लॅथम या जोडीने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली. त्यात टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन याच्याकडून मोठी चूक झाली.
शिखर धवन, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या वन डे सामन्यात न्यूझीलंडसमोर ३०७ धावांचे लक्ष्य उभे केले. शिखर धवन ( ७२) आणि शुबमन गिल ( ५०) या जोडीनं भारताला दमदार सुरुवात करून देताना १२४ धावांची भागीदारी केली, परंतु न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ९ चेंडूंच्या फरकाने दोघांनाही माघारी पाठवले. त्यानंतर रिषभ पंत (१५) व सूर्यकुमार यादव ( ४) हेही अपयशी ठरले आणि भारताची धावगती मंदावली. श्रेयस अय्यर ( ८०) व संजू सॅमसन ( ३६) यांनी ७७ चेंडूंत ९४ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. दुखापतीतून कमबॅक केलेल्या वॉशिंग्टन सुंदरने ( Washington Sundar ) सर्वांची वाहवाह मिळवली. त्याने १६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारासह नाबाद ३७ धावा केल्या. भारताने ७ बाद ३०६ धावा उभ्या केल्या.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडने सावध खेळ केला. फिन अॅलन व डव्हॉन कॉनवे ही जोडी विकेट टिकवून खेळत होती. त्यात युजवेंद्र चहलने फिनला जीवदान दिले, परंतु शार्दूल ठाकूरने त्याच षटकात फिनला ( २२) माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानतर उम्रान मलिकने कमाल केली. वेगवान मारा करताना त्याने किवी फलंदाजांची बोलती बंद केलीच, शिवाय दोन धक्के देत दडपणही निर्माण केले. उम्रानने किवींचा सलामीवीर कॉनवे ( २४) आणि डॅरील मिचेल ( ११) यांची विकेट घेतली. त्याने आजच्या सामन्यात १५३kmph वेगवान चेंडू टाकला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"