India vs New Zealand, 1st ODI Live : शुभमन गिलने ( Shubman Gill) आज रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी केली. २३व्या वर्षी असा पराक्रम करताना द्विशतक झळकावणाऱ्या युवा फलंदाजाचा विक्रम त्याने नावावर केला. शुभमनने आज सचिन तेंडुलकर, विराट कोहली, व्हिव्हियन रिचर्ड आदी दिग्गजांचेही विक्रम मोडले. त्याने १४९ चेंडूंत १९ चौकार व ९ षटकारांसह २०८ धावांची खेळी केली. भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला. रोहित शर्माने तीन द्विशतकं झळकावली आहेत. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग व इशान किशन यांनीही द्विशतकी खेळी केली आहे. बीसीसीआयने शुभमन गिलच्या या रेकॉर्ड ब्रेकींग खेळीचा साडेसात मिनिटांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
रोहित ( ३८) व शुभमन ही जोडी सलामीला आली अन् पुन्हा एकदा रोहितला मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहली ( ८) व इशान किशन ( ५) हे स्वस्तात माघारी परतले. सूर्यकुमार यादव ( ३१) व शुभमन यांनी भारताचा डाव सावरताना ५२ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली. शुभमन गिलला दोन जीवदान मिळाले अन् न्यूझीलंडला ते महागात पडले. भारताने ८ बाद ३४९ धावांचा डोंगर उभा केला. इशान किशनने २४ वर्ष व १४५ दिवसांचा असताना द्विशतक झळकावले होते, शुभमनने २३ वर्ष व १३२ वर्षांचा असताना हा पराक्रम करून द्विशतक झळकावणाऱ्या युवा फलंदाजाचा मान पटकावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"