Ind Vs NZ 1st ODI: वन-डे विश्वचषकाच्या तयारीला वेग येणार! न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची मालिका आजपासून

Ind Vs NZ 1st ODI Live: टी-२०मध्ये जुनेच डावपेच अमलात आणल्याने टीकेचे लक्ष्य ठरलेल्या टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध शुक्रवारपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 06:26 AM2022-11-25T06:26:52+5:302022-11-25T06:34:01+5:30

whatsapp join usJoin us
Ind Vs NZ 1st ODI: ODI World Cup preparations to speed up! Three match series against New Zealand from today | Ind Vs NZ 1st ODI: वन-डे विश्वचषकाच्या तयारीला वेग येणार! न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची मालिका आजपासून

Ind Vs NZ 1st ODI: वन-डे विश्वचषकाच्या तयारीला वेग येणार! न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची मालिका आजपासून

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑकलँड : टी-२०मध्ये जुनेच डावपेच अमलात आणल्याने टीकेचे लक्ष्य ठरलेल्या टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध शुक्रवारपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. 
या मालिकेद्वारे पुढच्या वर्षी स्वत:च्या यजमानपदाखाली खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीलाही वेग देण्याचा प्रयत्न असेल.
 २०२० ला विराट कोहलीच्या नेतृत्वात भारत न्यूझीलंडकडून ०-३ ने पराभूत झाला होता. पराभवाचा भूतकाळ  विसरून नव्याने सुरुवात करण्याचा शिखर धवन आणि सहकाऱ्यांचा प्रयत्न असेल. विश्वचषकाला अद्याप ११ महिने असल्यामुळे मधली फळी आणि गोलंदाजी आक्रमण भक्कम करण्यावर भर असणार आहे.
पाच वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल,  वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि वन डेत नंबर वन अष्टपैलू रवींद्र जडेजा या मालिकेत नाहीत. या सर्व वरिष्ठ खेळाडूंना बांगला देशविरुद्ध होणाऱ्या मालिकेपासून जास्तीत जास्त वन डे खेळावे लागतील.  त्यांच्या पुनरागमनानंतर संघसंयोजन बदललेले असेल. 
या वरिष्ठांच्या अनुपस्थितीत शिखर धवन नेतृत्व करीत आहे. त्याने मागच्या दोन वर्षांत जवळपास हजार धावा ठोकल्या. तो केवळ याच प्रकारात खेळला.  दुसरीकडे, विराट आणि रोहित यांनी टी-२० आणि कसोटीकडे अधिक लक्ष दिले. 
दरम्यान, शुभमन गिल याने वन डेत सलामीवीर म्हणून स्वत:ला सिद्ध केले.  त्याची धावसरासरी ५७ इतकी आहे,  स्ट्राईक रेटदेखील १०० हून अधिक आहे. अशा वेळी सलामीवीराच्या भूमिकेत रोहित-धवनशिवाय गिलदेखील असेल.  राहुल वन डेत मधल्या फळीत खेळतो. याच क्रमावर श्रेयस अय्यरदेखील आहे.

द्विपक्षीय मालिका प्रासंगिक व्हाव्या : विल्यमसन
    प्रेक्षकांना मैदानाकडे ओढण्यासाठी द्विपक्षीय मालिका अधिक प्रासंगिक करण्याची गरज असल्याचे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने म्हटले. टी-२० विश्वचषकाच्या चार दिवसांनी इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगली. यावेळी प्रेक्षकांनी स्टेडियमकडे पाठ फिरविल्याने बरीच चर्चाही झाली होती.
    विल्यमसन म्हणाला, ‘प्रेक्षकांची कमी संख्या दुर्दैवी आहे; पण अतिक्रिकेटदेखील होत आहे. त्यामुळेच द्विपक्षीय मालिका अधिक प्रासंगिक व्हायला हव्या. टी-२० सामन्यांमुळे वन डे सामन्यांची संख्या कमी होत आहे.’

कर्णधारपद गेले तरी निराश नव्हतो : धवन
पहिल्या वन-डेआधी आयोजित पत्रकार परिषदेत शिखर धवन याला  झिम्बाब्वे दौऱ्याबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने सडेतोड उत्तर दिले. झिम्बाब्वे दौऱ्यात शिखरऐवजी लोकेश राहुलकडे नेतृत्व सोपविण्यात आले होते. शिखर धवन म्हणाला की, ‘तुम्ही एक चांगला प्रश्न विचारला. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर मला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे. हे माझ्यासाठी आव्हान आहे. आमच्याकडे तरुण खेळाडू अधिक आहेत. त्यामुळे त्यांना जास्त वाव दिल्यास अधिक जास्त पर्याय संघाकडे उपलब्ध होऊ शकतात. कॅप्टन्सी ही काय येते आणि जाते, आपण सगळे जण रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने जातो... तेव्हा त्या गोष्टींचा फारसा विचार करण्याची गरज नाही.’

मालिकेबाबत बोलायचे झाल्यास पाच दिवसांत तीन वन डे खेळले जाणार. अशा स्थितीत  वेगवान गोलंदाजांना थकवा जाणवणार आहे.  दीपक चाहर आणि शार्दूल ठाकूर यांना नव्या चेंडूची जबाबदारी सोपविली जाईल. हे दोघे तळाच्या फळीत फलंदाजीसाठीही उपयुक्त असतील. अर्शदीप तिसरा पर्याय असेल. तो बाहेर बसल्यास कुलदीप सेन किंवा उमरान मलिक यांच्यापैकी एकाला संधी दिली जाईल. 
ईडन पार्कचे मैदान फारच लहान आहे. यामुळे अतिरिक्त वेगवान गोलंदाजासह किंवा कुलदीप यादवच्या समावेशासह खेळण्याची धवनला काळजी घ्यावी लागेल. न्यूझीलंडने टी-२० मालिकेत खेळलेला संघ वन डे मालिकेतही कायम ठेवला आहे. टीम साउदी, ॲडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री आणि फिरकीपटू मिशेल सेंटनर असे गोलंदाजीतील पर्याय यजमान  संघाकडे उपलब्ध आहेत.

Web Title: Ind Vs NZ 1st ODI: ODI World Cup preparations to speed up! Three match series against New Zealand from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.