Ravi Shastri Team India, IND vs NZ: भारतीय संघाचा सध्या न्यूझीलंड दौरा सुरू आहे. अनुभवी सलामीवीर शिखर धवन भारताच्या वन-डे संघाचे नेतृत्व करत आहे. भारतीय संघाला तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. श्रेयस अय्यरच्या ८०, शिखर धवनच्या ७२ आणि शुबमन गिलच्या ५० धावांच्या जोरावर भारताने ५० षटकात ७ बाद ३०६ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडच्या संघाने हा सामना ७ गडी राखून जिंकला. टॉम लॅथमच्या नाबाद १४५ आणि केन विल्यमसनच्या नाबाद ९४ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने १७ चेंडू राखून भारताचा पराभव केला. एकीकडे वन डे मालिका सुरू असतानाच, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका खेळाडूबद्द अतिशय महत्त्वाचे विधान केले. 'तो' खेळाडू अतिशय चांगला आणि प्रतिभावान असूनही त्याला अपेक्षित सन्मान मिळत नाही, असे मत शास्त्रींनी केले.
"तो क्रिकेटर खूप जास्त अनुभवी आहे. पण असे असूनही त्याचे अपेक्षित कौतुक केले जात नाही. त्याला त्याच्या स्तराचा किंवा दर्जाचा मान-सन्मान मिळत नाही. खरे सांगायचे तर, सर्वाधिक स्पॉटलाइट विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावर असतो. त्यामुळे असे होते. पण जेव्हा तुम्ही शिखर धवनचा वन डे क्रिकेटमधील रेकॉर्ड बघाल, तेव्हा तुम्ही काही गोष्टींकडे नीट लक्ष देऊ शकता. महत्त्वाची बाब म्हणजे, मोठ्या सामन्यांमध्ये शिखर धवनचे रेकॉर्ड उत्तम आहे. अव्वल संघांविरुद्ध त्याने खेळलेली खेळी, हा एक उत्कृष्ट विक्रम आहे," असे रवी शास्त्री म्हणाले.
"भारतीय संघात डावखुरा सलामीवीर असेल तर त्याचा खूप सकारात्मक फरक पडतो. शिखर धवन हा स्ट्रोक प्लेयर आहे, त्याला फटके मारण्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागत नाही. वेगवान गोलंदाजीचा सामना करण्यासाठी त्याच्या भात्यात पुल, कट आणि ड्राईव्ह असे अनेक शॉट्स आहेत. चेंडू वेगाने बॅटवर येत असेल तर तो नक्कीच तुफान फटकेबाजी करण्यास सक्षम असतो. न्यूझीलंडमध्ये खेळताना त्याच्या अनुभवाचा भारतीय संघाला नक्कीच फायदा होईल. सध्याच्या भारतीय संघात अनेक प्रतिभावान युवा खेळाडू आहेत, पण धवनचा अनुभव नक्कीच महत्त्वाचा आहे," असेदेखील शिखर धवनने स्पष्ट केले.