India vs New Zealand, 1st ODI : बांगलादेशविरुद्धच्या वन डेत द्विशतक झळकावूनही इशान किशनला ( Ishan Kishan) श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची संधी दिली गेली नाही. रोहित शर्माला दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतून माघार घ्यावी लागली अन् इशानने संधीचं सोनं करताना वेगवान द्विशतक झळकावले. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ४४०+ धावांचा डोंगर उभा केला. या फटकेबाजीमुळे भारताने ती वन डे मालिका जिंकली. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत इशानला बाकावर बसवून ठेवले गेले. आता न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत तरी त्याला संधी मिळतेय का, याची चाहत्यांना उत्सुकता होती अन् कर्णधार रोहितने पहिल्या वन डे पूर्वीच अपडेट्स दिले.
वर्ल्ड कप सामन्यांची वेळ बदलण्याच्या आर अश्विनच्या कल्पनेला रोहित शर्माचा पाठिंबा; जाणून घ्या का
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. लोकेश राहुल व अक्षर पटेल हे कौटुंबिक कारणास्तव या मालिकेत खेळत नाहीत. अशा परिस्थितीत संघात बॅक अप यष्टिरक्षक म्हणून केएस भरत आहे. पण, रोहितने उद्याच्या सामन्यात इशान किशनला संधी मिळेल हे स्पष्ट केले. तो सलामीला नव्हे, तर मधल्या फळीत खेळणार असल्याचे रोहितने सांगितले. लोकेश राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत आहे आणि त्याच्या गैरहजेरीत इशान या क्रमांकावर खेळेल. रोहित म्हणाला, इशान मधल्या फळीत फलंदाजी करेल. बांगलादेशविरुद्धच्या दमदार खेळीनंतर तो संघात पुनरागमन करत असल्याचा मला आनंद आहे.
भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा इशान हा चौथा फलंदाज आहे. यापूर्वी रोहित शर्मा ( ३), सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांनी हा पराक्रम केला आहे. रोहित व शुभमन गिल ही जोडी सलामीला खेळणार आहे. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यापैकी कोणाला संधी मिळते याची उत्सुकताही आहे. भारताचा वन डे संघ ( वि. न्यूझीलंड) - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत ( यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक.
न्यूझीलंडचा वन डे संघ : फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (कर्णधार भारताविरुद्ध), अॅडम मिल्ने, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, हेन्री शिपले, ईश सोढी
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"