भारत विरुद्ध न्यूझिलंडच्या पहिल्या वन डे सामन्यात भारताचा फलंदाज शुभमन गिलने रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी केली. त्याने १४९ चेंडूंत १९ चौकार व ९ षटकारांसह २०८ धावांची खेळी केली आणि भारताची धावसंख्या ३४९ धावांपर्यंत पोहोचवली. २३व्या वर्षी असा पराक्रम करताना द्विशतक झळकावणाऱ्या युवा फलंदाजाचा विक्रम त्याने नावावर केला. भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला.
रोहित शर्माने तीन द्विशतकं झळकावली आहेत. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग व इशान किशन यांनीही द्विशतकी खेळी केली आहे. इशान किशनने २४ वर्ष व १४५ दिवसांचा असताना द्विशतक झळकावले होते, शुभमनने २३ वर्ष व १३२ वर्षांचा असताना हा पराक्रम करून द्विशतक झळकावणाऱ्या युवा फलंदाजाचा मान पटकावला.
शुभमन गिलने सामना संपल्यानंतर खुलासा केला की, त्याला द्विशतक होईल अशी अपेक्षा नव्हती. पण ४७ व्या षटकात दोन षटकार मारल्यानंतर त्याला आत्मविश्वास आला की हे शक्य आहे. जे चेंडू माझ्याकडे येत होते तेच मी खेळत होतो. सामना सुरु होण्याआधी बाहेर जाऊन मला काय करायचे आहे हे दाखवण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत होतो. गोलंदाजांवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता असते, मी तेच करत होतो. त्यामुळे गोलंदाजांवर दडपण आले, असं शुभमन गिलने सांगितले.
इशान किशन माझ्या सर्वोत्तम जोडीदारांपैकी एक आहे. त्याने वनडेत द्विशतक झळकावले तेव्हा मी तिथे होतो आणि ते विशेष होते. जेव्हा तुम्हाला काहीतरी करायचे असते आणि ते नियमितपणे येत असते तेव्हा छान वाटते. या द्विशतकानंतर निश्चितच समाधानाची भावना वाटत असल्याचं शुभमन गिलने सांगितले.
दरम्यान, भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे ६ फलंदाज १३१ धावांवर माघारी परतल्यानंतर भारत सहज विजय मिळवेल असाच अंदाज होता. पण, मायकेल ब्रेसवेल व मिचेल सँटनर यांनी १०२ चेंडूंत १६२ धावांची विक्रमी भागीदारी करताना यजमानांना अखेरपर्यंत टक्कर दिली. ब्रेसवेलने विक्रमी शतक झळकावले, तर सँटनर अर्धशतक झळकावून माघारी परतला. मोहम्मद सिराजने मोक्याच्या क्षणी ही भागीदारी तोडली अन् सामन्यात रंगत आणली. हार्दिक पांड्याने ४९ व्या षटकात ४ धावा देत भारताला विजयाचे स्वप्न दाखवले अन् शार्दूलने अखेरच्या षटकात ब्रेसवेलची विकेट घेत थरारक विजय पक्का केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"