India vs New Zealand, 1st T20: जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये बुधवारी भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतला पहिला ट्वेन्टी-२० सामना खेळणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध भारत एकूण तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय संघानं नेट्समध्ये सरावाला देखील सुरुवात केली आहे. भारतीय संघात यावेळी व्यंकटेश अय्यर याला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. व्यंकटेश अय्यर याचा हार्दिक पंड्याच्या जागी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. हार्दिक पंड्या गोलंदाजीसाठी पूर्णपणे फिट नाही आणि ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये त्यानं निराशाजनक कामगिरीची नोंद केली. त्यामुळे हार्दिक पंड्याला निवड समितीनं बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर दुसरीकडे आयपीएलच्या यंदाच्या मोसमात खणखणीत कामगिरीची नोंद केलेल्या व्यंकटेश अय्यर याच्याकडून भारतीय संघाच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत. विशेष म्हणजे भारतीय संघाचा नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील व्यंकटेशवर खास लक्ष ठेवून आहे.
जयपूरमध्ये भारतीय संघाच्या सरावावेळी राहुल द्रविडनं व्यंकटेश अय्यरच्या सरावाकडे विशेष लक्ष दिलं. स्वत: राहुल द्रविडनं व्यंकटेश अय्यर याच्याकडून सराव करुन घेतला. राहुल द्रविड स्वत: नेट्समध्ये व्यंकटेश अय्यरला थ्रो डाऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. तसंच भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्मासोबत देखील राहुल बराच वेळ चर्चा करताना दिसला.
भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाचा आहे मध्यमगती गोलंदाज अन् अष्टपैलूभारतीय संघ नक्कीच एक मध्यमगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडूला नेहमी संघात स्थान देऊ इच्छितो असं विधान कर्णधार रोहित शर्मानंही पत्रकार परिषदेत केलं होतं. आम्ही हार्दिकपेक्षा अधिक चांगला पर्याय नव्हे, तर आम्हाला फक्त आमची फलंदाजी आणखी खोलवर न्यायची आहे. एक मध्यमगती गोलंदाजी करु शकणारा अष्टपैलू खेळाडू आम्हाला संघात हवा आहे, असं रोहित शर्मा म्हणाला होता.