India vs New Zealand 1st T20I Live : डॅरील मिचेल आणि डेव्हॉन कॉनवे या जोडीने भारताच्या गोलंदाजांची धुलाई केली. वॉशिंग्टन सुंदरच्या ( Washington Sundar ) एका षटकाने मॅच फिरवली. कॉनवे अर्धशतक झळकावून माघारी परतला. न्यूझीलंडने पहिल्या ट्वेंटी-२०त भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी करण्यात यश मिळवले. डॅरील मिचेलने अखेरच्या षटकांत चांगले फटके मारले अन् अर्धशतक पूर्ण केले. अर्शदीप सिंगच्या अखेरच्या षटकात त्याने २७ धावा चोपल्या.
फिन ॲलन आणि डेव्हॉन कॉनवे ही जोडी सलामीला आली अन् हार्दिकच्या पहिल्याच षटकात फिनने दोन खणखणीत चौकार खेचून इरादा स्पष्ट केला. पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर फिनने उत्तुंग फटका मारला आणि सूर्यकुमार यादवने झेल घेत त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. फिन २३ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ३५ धावांवर बाद झाला. त्यानंतर किवींनी डावखुरा फलंदाज मार्क चॅम्पमनला पाठवले. सुंदरने टाकलेला पहिला चेंडू यष्टींच्या अगदी जवळून गेल्याने चॅम्पमन थोडा गांगरला. त्यानंतर सहाव्या चेंडूवर सरळ फटका खेळला, परंतु सुंदरने हवात झेपावत अफलातून झेल घेतला. किवींचे दोन फलंदाज ४३ धावांवर माघारी परतले. कॉनवे व ग्लेन फिलिप्स मैदानावर खिंड लढवत होता. दरम्यान, हा सामना पाहण्यासाठी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीसह स्टेडियमवर उपस्थित होता. कॅमेराने त्याची छबी टिपल्यानंतर रांचीच्या स्टेडियमवर धोनी नावाचा गजर घुमला. कॉनवे व फिलिप्स यांची ६० धावांची भागीदारी कुलदीप यादवने तोडली. त्याने फिलिप्सला १७ धावांवर माघारी पाठवले. १५व्या षटकात कुलदीपच्या गोलंदाजीवर कॉनवेसाठी जोरदार अपील झाले. कॉनवेचा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न फसला अन् चेंडू यष्टिरक्षक इशान किशनने टिपला. मैदानावरील अम्पायरने नाबाद निर्णय दिला होता अन् भारताने DRS घेतला, परंतु तो पाया गेला. सुंदरच्या षटकात डॅरील मिचेल Umpire Call मुळे नाबाद राहिला. कॉनवेने ३१ चेंडूंत ट्वेंटी-२०तील ९वे अर्धशतक पूर्ण केले. कॉनवे आयपीएमध्ये CSK कडून खेळतो आणि त्याचा खेळ पाहून धोनी नक्की सुखावला असेल. सुंदरने ४-०-२२-२ आणि कुलदीपने ४-०-२०-१ अशी कामगिरी केली. १८व्या षटकांत धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात कॉवने ५२ धावांवर झेलबाद झाला. अर्शदीपने ही विकेट मिळवून दिली. त्याच षटकात इशानच्या सुरेख थ्रोने मायकेल ब्रेसवेलला ( १) रन आऊट केले. मिचेलची फटकेबाजी सुरूच होती. अर्शदीपने २०व्या षटकात नो बॉल टाकला अन् त्यावर मिचेलने षटकार खेचला. फ्री हिटवरही मिचेलने सिक्स मारला. सलग तिसरा षटकार खेचून मिचेलने २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मिचेलने अखेरच्या षटकात २७ धावा पोचल्या अन् न्यूझीलंडने ६ बाद १७६ धावा उभ्या केल्या. मिचेल ५९ धावांवर नाबाद राहिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"