India vs New Zealand 1st T20I Live : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका सुरू झाली. या सामन्यात पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. बऱ्याच दिवसानंतर तो टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. बीसीसीआयने पृथ्वी शॉचा एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि ज्यामध्ये तो संघात परतल्याबद्दल खूप आनंदी दिसत आहे. त्याने आपल्या भावना देखील शेअर केल्या आहेत.
हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून घेतला अचंबित करणार निर्णय, पृथ्वीसह स्टार फिरकीपटूला बसवले बाकावर
वन डे मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, यावेळी अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला किवींचा सामना करायचा आहे. त्यामुळे यजमानांसाठी हे आव्हान सोपं नक्की नसेल. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असेल असे अजित आगरकरने सामन्यापूर्वी सांगितले होते. पण, हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, जितेश शर्मा व पृथ्वी शॉ यांना आजच्या सामन्यात संधी दिलेली नाही.
या व्हिडिओमध्ये पृथ्वी शॉ म्हणला, “बर्याच काळापासून संघाचा भाग नव्हतो, पण परत आल्याने खूप आनंदी आहे. माझे वडील आणि माझ्याशी संबंधित असलेले प्रत्येकजण आनंदी आहेत. मला खूप दिवसांनी बोलावण्यात आले आहे, यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे, त्यामुळे मी आनंदी आहे. माझी निवड झाली तेव्हा रात्रीचे १०.३० वाजले होते आणि मी झोपलो होतो. मला फोन आणि मित्रांद्वारे याबद्दल माहिती मिळाली.''
पृथ्वी शॉ पुढे म्हणतो, जेव्हा मला पहिल्यांदा टीम इंडियाकडून कॉल आला तेव्हा मला खूप आनंद झाला आणि मला खूप अभिमान वाटला. भारतासाठी प्रथमच कसोटी कॅप घालणे ही माझ्यासाठी वेगळी भावना होती. मला नेहमीच भारतासाठी कसोटी सामने खेळायचे होते. त्यामुळे पहिल्यांदाच भारतीय संघात सामील होणे माझ्यासाठी खूप खास होते. या काही वर्षांत माझ्या आयुष्यात चढ-उतार आले असले तरी, कठीण काळातून तुम्ही नेहमीच काहीतरी शिकता. मी स्वतःकडे खूप लक्ष दिले आहे, मला माहित आहे की लहान गोष्टी तुम्हाला परिपूर्ण बनवण्यात मोठी भूमिका बजावतात.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेबाबत तो म्हणाला की, टीम इंडियाने जिंकावे अशी माझी इच्छा आहे. मला संधी मिळाली तर मी माझे १०० टक्के देईन. टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी मला बोलावले जाईल, असे मला वाटले नव्हते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"