India vs New Zealand 1st T20I Live Update : राहुल द्रविड ( मुख्य प्रशिक्षक) व रोहित शर्मा ( फुल टाईम कर्णधार) यांनी नव्या इंनिंगच्या पहिल्याच परिक्षेत विजय मिळवला. न्यूझीलंडनं तगडं आव्हान उभं करूनही रोहित ( Rohit Sharma) व सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी दमदार खेळ केला. रोहितच्या हुकलेल्या अर्धशतकाची भरपाई सूर्यकुमारनं टोलेजंगी फटकेबाजीनं केली. भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या दोन षटकांत केवळ १२ धावा दिल्या आणि किवी गोलंदाजांना लक्ष्याचा बचाव करण्यासाठी अखेरच्या दोन षटकांत १६ धावा करण्यापासून टीम इंडियाला रोखायचे होते. टीम साऊदीनं १९व्या षटकात विकेट घेत सामन्यातील चुरस आणखी वाढवली. पदार्पणवीर वेंकटेश अय्यरनं ( Venkatesh Iyer) बिनधास्त खेळ करताना चौकार खेचला, पण पुढच्याच चेंडूवर विकेटही देऊन बसला. रिषभ पंतनं चौकार खेचून टीम इंडियाला थरारक विजय मिळवून दिला.
मार्क चॅपमॅन ( Mark Chapman) व मार्टीन गुप्तील ( Martin Guptill ) यांची शतकी भागीदारी आणि वैयक्तिक अर्धशतकी खेळीनं टीम इंडियाच्या गोलंदाजांची वाईट अवस्था केली. या सामन्यात चॅपमॅननं वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवला. दोन देशांकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा तो जगातला पहिला फलंदाज ठरला. हाँगकाँगकडून खेळताना २०१५मध्ये त्यानं ओमानविरुद्ध नाबाद ६३ धावा केल्या होत्या आणि आज न्यूझीलंडकडून खेळताना भारताविरुद्ध ६३ धावांची खेळी केली. पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा सलामीवीर डॅरील मिचेल ( ०) याचा त्रिफळा उडवला. पण, चॅपमॅन व मार्टीन गुप्तील यांनी चांगली फटकेबाजी केली. चॅपमॅन ५० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारासह ६३ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्याच षटकात ग्लेन फिलिप्सलाही ( ०) अश्विननं पायचीत केलं. यावेळी फिलिप्सनं घेतलेला DRS वाया गेला. अश्विननं त्याच्या वाट्याच्या चार षटकांत २३ धावा देत २ विकेट्स घेतल्या. गुप्तीनं १५व्या षटकात सिराजला खणखणीत षटकार खेचताना अर्धशतक पूर्ण केलं. १८व्या षटकात त्यानं चहरनं टाकलेला चेंडू ९८ मीटर लांब भिरकावला. पुढचा चेंडूही तसाच टोलवण्याच्या प्रयत्नात गुप्तील झेलबाद झाला. त्यानं ४२ चेंडूंत ३ चौकार ४ षटकारासह ७० धावा केल्या. चहरनं ४ षटकांत सर्वाधिक ४२ धावा देत १ विकेट घेतली. न्यूझीलंडनं २० षटकांत ६ बाद १६४ धावा केल्या. सिराजनंही ४ षटकांत ३९ धावा देत १ विकेट घेतली.
सामना रंगात आला असताना किवी खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणाच मोठ्या चुका झाल्या. ट्रेंट बोल्टनं सूर्यकुमारचा सोपा झेल सोडलाच, शिवाय चौकारही दिला. त्यामुळे टीम साऊदीचा पारा चढला. पण, बोल्टनंच ही विकेट मिळवून देताना सूर्यकुमारचा त्रिफळा उडवला. सूर्यकुमारनं ४० चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ६२ धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत ही नवी जोडी खेळपट्टीवर होती आणि त्यांच्यावर दडपण निर्माण करण्यात किवी गोलंदाजांनी यश मिळवले होते. १२ चेंडूंत १६ धावा टीम इंडियाला बनवायच्या होत्या आणि टीम साऊदीनं १९व्या षटकात ६ धावा देताना एक विकेट घेतली. आता भारताला अखेरच्या षटकांत १० धावांची गरज होती. दोन्ही डावखुरे फलंदाज खेळपट्टीवर असल्यामुळे किवींनी डॅरील मिचेलला पाचारण केलं. वेंकटेश अय्यरनं चौकार मारून दडपण हलकं केलं, परंतु पुढील चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला.
४ चेंडू ५ धावा हव्या असताना मिचेलनं Wide टाकला. त्यानंतर ३ चेंडूंत ३ धावा हव्या असताना रिषभनं चौकार खेचून भारताचा विजय पक्का केला आणि भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. भारतानं ५ विकेट्स राखून बाजी मारली. रिषभ १७ धावांवर नाबाद राहिला.