India vs New Zealand, 1st Test : रोहित शर्मानं फुल टाइम कर्णधार म्हणून पहिल्याच ट्वेंटी-२० मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवलं. आता अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाची कसोटी आहे. २५ नोव्हेंबरपासून कानपूर येथे पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे आणि विराट कोहली विश्रांतीवर असल्यानं अजिंक्यकडे नेतृत्वाची जबाबदारी आहे. पण, पहिल्याच कसोटीपूर्वी अजिंक्यची डोकेदुखी वाढली आहे. स्वतःचा फॉर्म हा चिंतेचा विषय होताच, परंतु आता प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत प्लेइंग इलेव्हन कशी निवडायची हा प्रश्न अजिंक्यला सतावत आहे. आता राहुल द्रविडच ( Rahul Dravid) हा तिढा सोडवणार आहे.
कसोटी मालिकेसाठी श्रेयस अय्यरचा संघात समावेश करण्यात आला आहे, परंतु तो कोणत्या क्रमांकावर खेळेल हा खरा प्रश्न आहे. ट्वेंटी-२० मालिकेनंतर रोहित शर्मानं विश्रांती घेतल्यामुळे कसोटीत लोकेश राहुलसह सलामीला कोण उतरणार, हे कोडं सोडवावं लागणार आहे. रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश, मयांक अग्रवाल व शुबमन गिल हे तिन पर्याय आहेत, परंतु यापैकी दोघांनाच संधी मिळू शकते. लोकेशचे संघातील स्थान पक्के आहे आणि मयांक व शुबमन याच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. लोकेश व मयांकला सलामीला खेळवून शुबमनला मधल्या फळीत खेळवण्याचा विचार सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
पण, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मधल्या फळीत शुबमनसमोर श्रेयस अय्यर हा पर्याय आहे. हनुमा विहारी भारत अ संघासह दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असल्यानं शुबमन व श्रेयस यांच्यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. संघ व्यवस्थापन शुबमनकडे सलामीवीर म्हणून पाहत असेल तर श्रेयसचे खेळणे पक्के आहे. पण, व्यवस्थापनाला चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांच्यानंतर मधल्या फळीत सक्षम पर्याय तयार करायचा आहे आणि त्यासाठी आतापासूनच हालचाली सुरू कराव्या लागतील.
कानपूरची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना साथ देणारी आहे. पण, नाणेफेकीचा कौलही तितकाच निर्णायक ठरणार आहे. अक्षर पटेलनं इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कमाल केली होती, परंतु आर अश्विन व रवींद्र जडेजा ही कसोटीत भारताची पहिली पसंती आहे. इंग्लंड दौऱ्यावर अश्विनला चारही कसोटीत बाकावर बसवले गेले. आताही तसेच होण्याची शक्यता आहे. अशा वेळी जडेजा व अक्षर पटेल ही फिरकी जोडी मैदानावर दिसेल. मोहम्मद सिराज तंदुरुस्त झाल्यात तो इशान शर्मासह प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसेल. सिराज फिट नसल्यास उमेश यादव खेळेल.