कानपूर: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ उत्तम स्थितीत आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होताच भारतीय फलंदाज ढेपाळले. भारताची सलामीची जोडी आणि मधल्या फळीनं न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर लोटांगण घातलं. मात्र श्रेयस अय्यर आणि रवीचंद्रन अश्विननं मोलाची भागिदारी करत भारताचा डाव सावरला.
चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ सुरू होताच भारताचे चार फलंदाज लवकर बाद झाले. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, मयांक अग्रवाल आणि रविंद्र जाडेजा स्वस्तात माघारी परतले. त्यामुळे भारतीय संघ ५ बाद ५१ अशा अडचणीत सापडला. यानंतर रवीचंद्रन अश्विननं श्रेयस अय्यरसोबत ५२ धावांची भागिदारी रचली आणि भारताला संकटातून बाहेर काढलं.
अश्विननं ६२ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या. यामध्ये ५ चौकारांचा समावेश आहे. या दरम्यान अश्विननं विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या मधल्या फळीतील महत्त्वाच्या फलंदाजांना मागे टाकलं. २०२१ मध्ये अश्विनची फलंदाजीतील सरासरी कोहली, पुजारा आणि रहाणेपेक्षा उत्तम आहे. बाकीचे तीनही खेळाडू सध्या फॉर्ममध्ये नाहीत. त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
२०२१ मध्ये अश्विननं ७ सामन्यांत ३०.६३ च्या सरासरीनं ३३७ धावा केल्या आहेत. तर चेतेश्वर पुजारानं १२ सामन्यांत ६३९ धावा काढल्या आहेत. त्याची सरासरी ३०.४२ आहे. विराट कोहलीनं ९ सामन्यांत २९.८० च्या सरासरीनं ४४७, तर अजिंक्य रहाणेनं १२ सामन्यांत १९.५७ च्या सरासरीनं ४११ धावा केल्या आहेत.