कानपूर : अक्षर पटेल- रविचंद्रन आश्विन यांनी फिरकीचा फास आवळत आठ गडी बाद केले. याबळावर भारतीय संघाने पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला पहिल्या डावात २९६ धावांत गुंडाळून आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताने देखील दुसऱ्या डावात १४ धावांच्या मोबदल्यात शुभमन गिलला (१) गमावल्याने भारताची एकूण आघाडी ६३ धावांची झाली आहे. खेळ थांबला त्यावेळी मयंक अग्रवाल ४ आणि चेतेश्वर पुजारा ९ धावांवर खेळत होते.भारताची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकात काईल जेमिसन याने पहिल्याच चेंडूवर शुभमनला त्रिफळाबाद केले. जेमिसनचा हा ५० वा कसोटी बळी ठरला. तिसरा दिवस भारताच्या गोलंदाजांनी गाजवला. न्यूझीलंड एकवेळ एक बाद १९६ अशा भक्कम स्थितीत होता. त्यांचे नऊ गडी शंभर धावात बाद झाले. अक्षरने ३४ षटकांत ६ षटके निर्धाव टाकून ६२ धावांत पाच गडी बाद केले. आश्विनने ४२.३ षटकांत ८२ धावांत तीन आणि रवींद्र जडेजाने एक गडी बाद केला. भारताला वर्चस्व गाजविण्याची संधी मिळवून दिली ती उमेश यादवने केन विलियम्सनला वलकर बाद करीत उमेशने दिलासा मिळवून दिला. टॉम लाथमने २८२ चेंडूत ९५ आणि विल यंग याने २१८ चेंडूत ८९ धावांचे योगदान दिले. विलियम्सन मात्र अडखळला. ६४ चेंडू खेळून केवळ १८ धावा केल्यानंतर तो उमेशच्या चेंडूवर पायचीत झाला.
पंचांशी वाद अन् द्रविडचा हस्तक्षेप...आश्विन टॉम लॅथमला राउंड द विकेट गोलंदाजी करीत थेट पंचांसमोर क्रॉसिंग करत होता. यामुळे पंचांना त्रास होत होता. ७७ व्या षटकात नितीन मेननने आश्विनला प्रथमच रोखले. फॉलो-थ्रूबद्दल इशारा दिला. कर्णधार अजिंक्य रहाणेही आश्विनसोबत मेनन यांच्याशी बोलला. पंचांनी आश्विनच्या दोन तक्रारी केल्या. आश्विन धोक्याच्या भागात येत होता पण टीव्ही रिप्लेमध्ये हे स्पष्ट जाणवत होते की, धोक्याच्या भागात येण्यापूर्वी तो अतिशय हुशारीने क्रॉस करीत होता. शिवाय आश्विन समोर आल्याने पंचांना चेंडू पाहणे अवघड जात होते. हे प्रकरण गंभीर बनले. पंच आश्विनला वारंवार थांबवत होते. अखेर प्रशिक्षक राहुल द्रविड थेट मॅच रेफ्री जवागल श्रीनाथ यांना भेटायला गेले. द्रविड बोलून परतल्यानंतर अम्पायर आणि आश्विन यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. सुरुवातीच्या चार कसोटी सामन्यातील सात डावात ३२ गडी बाद करणारा अक्षर स्वत:ला कधीही मर्यादित षटकांचा तज्ज्ञ गोलंदाज मानत नाही. मी टी-२० चादेखील तज्ज्ञ नाही, कौशल्याच्या बळावर खेळण्याचा आनंद लुटतो, असे त्याने न्यूझीलंडचा अर्धा संघ बाद केल्यानंतर सांगितले.
सात डावात पाच गडी बाद करण्याची कामगिरी पाचव्यांदा केल्यानंतर गुजरातचा खेळाडू अक्षर म्हणाला, ‘मी फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर ही कामगिरी केली हे मान्य असले तरी ही अविश्वसनीय कामगिरी म्हणावी लागेल. प्रथम श्रेणी किंवा भारत अ संघासाठी खेळताना कामगिरी केली. यादरम्यान स्वत:ला तज्ज्ञ गोलंदाज मानले नाही. संधी मिळेल तेव्हा चांगली कामगिरी करायची, इतकेच डोक्यात असते. या यशाचे श्रेय माझ्यावर विश्वास दाखविणाऱ्या संघातील सहकाऱ्यांना जाते. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.’अश्विन आणि जडेजा यांच्या उपस्थितीत अतिरिक्त दडपण येते का, असे विचारताच अक्षर म्हणाला, ‘मी जेव्हा मैदानावर असतो तेव्हा स्वत:कडून शंभर टक्के प्रयत्न करतो. अश्विन आणि जडेजा सोबत आहे की नाही, याकडे लक्ष नसते. खेळपट्टीचे स्वरूप समजून घ्यायचे, त्यानुसार योजना आखायची आणि गोलंदाजी करून खेळाचा आनंद लुटायचा, इतके सोपे माझ्या यशाचे गमक आहे.’ कानपूरच्या खेळपट्टीला भेगा गेलेल्या नाहीत. चेंडू फार कमी वळण घेत आहे, असे अक्षरने सांगितले.
साहा मैदानाबाहेर अनुभवी यष्टिरक्षक रिद्धिमान साहा याला गळ्याचा त्रास जाणवू लागताच तिसऱ्या दिवशी तो यष्टिरक्षणासाठी मैदानात आला नाही. श्रीकर भरत याने यष्टिरक्षकाची भूमिका बजावली. ३७ वर्षांचा साहा नेहमी मैदानावर जखमी होत असून, त्याला फिटनेसची समस्या भेडसावत असते.
नर्व्हस नाईंटिज : टॉम लाथमला अक्षरच्या चेंडूवर यष्टिरक्षक श्रीकर भरतने ९५ धावांवर यष्टिचीत केले, त्याआधी दुसऱ्या दिवशी त्याला तीन वेळा जीवदान मिळाले होते. आज आश्विनच्या चेंडूवर पुन्हा एकदा जीवदान मिळाले. तरीही पाच धावांनी त्याचे १२ वे कसोटी शतक हुकले. आज भारताविरुद्ध त्याचे सहावे अर्धशतक ठरले.
भारत पहिला डाव : ३४५, न्यूझीलंड पहिला डाव : टॉम लाथम यष्टिचीत गो. अक्षर पटेल ९५, विल यंग झे. भरत गो. आश्विन ८९, केन विलियम्सन पायचीत गो. यादव १८, रॉस टेलर झे. भरत गो. अक्षर पटेल ११, हेन्री निकोल्स पायचीत गो. अक्षर पटेल २, टॉम ब्लाँडेल त्रि.गो. अक्षर पटेल १३, रचिन रवींद्र त्रि.गो. रवींद्र जडेजा १३, काईल जेमिसन झे. अक्षर पटेल गो. आश्विन २३, टीम साऊदी त्रि. गो. अक्षर पटेल ५, विलियम सोमरविले त्रि.गो. आश्विन ६, अजाज पटेल नाबाद ५, अवांतर १६, एकूण : १४२.३ षटकात सर्वबाद २९६ धावा.गडी बाद क्रम : १-५१, २-१९७, ३-२१४, ४-२१८, ५-२२७, ६-२४१, ७-२५८, ८-२७०, ९-२८४, १०-२९६. गोलंदाजी : ईशांत शर्मा १५-५-३५-०, उमेश यादव १८-३-५०-१, रविचंद्रन आश्विन ४२.३-१०-८२-३, रवींद्र जडेजा ३३-१०-५७-१, अक्षर पटेल ३४-६-६२-५.भारत दुसरा डाव : मयंक अग्रवाल नाबाद ४, शुभमन गिल त्रि.गो. जेमिसन १, चेतेश्वर पुजारा नाबाद ९, अवांतर ००, एकूण : ५ षटकात १ बाद १४ धावा. बाद क्रम : १-२.गोलंदाजी : साऊदी २-१-२-०, जेमिसन २-०-८-१, पटेल १-०-४-०