कानपूर - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून सुरू झालेल्या कानपूर कसोटीमध्ये पहिल्या दिवसअखेर भारताने ४ बाद २५८ धावा जमवल्या आहेत. भारताच्या डावात सलामीवीर शुभमन गिल याच्या अर्धशतकी खेळीचा समावेश होता. दरम्यान, या अर्धशतकी खेळीनंतर शुभमन गिल याने आपल्याकडून एक मोठी चूक झाल्याचे सांगितले.
शुभमन गिल म्हणाला की, कसोटीच्या पहिल्या दिवशी उपाहारानंतर वेगवान गोलंदाज कायले जेमिन्सनला स्विंग मिळेल असे वाटले नव्हते. पहिल्या हप्त्यात त्याने चांगली गोलंदाजी केली. तसेच उपाहारानंतर त्याने खूपच चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे त्याचा चेंडू कधी रिव्हर्स स्विंग होईल, हे कळत नव्हते. मलाही एवढ्या लवकर रिव्हर्स स्विंग मिळेल, असे वाटले नव्हते.
गिल म्हणाला की, कसोटी क्रिकेटमध्ये हेच होते. तुम्हाला परिस्थितीचे आकलन वेगाने करावे लागते. या डावात मी चेंडू त्या पद्धतीने ओळखू शकलो नाही. दरम्यान, न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजीचा सामना गिलने चांगल्या पद्धतीने केला. याचं श्रेय गिलने नेट्समध्ये रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या गोलंदाजीवर केलेल्या सरावाला दिले.
दरम्यान, शुभमन गिलने तीन विकेट्स पडल्यानंतर संघाचा डाव सावरण्यासाठी श्रेयस अय्यरचे कौतुक केले. तसेच दीर्घकाळानंतर प्रेक्षकांसमोर खेळता आल्याने शुभमनने समाधान व्यक्त केले. त्याने सांगितले की, एवढ्या दिवसांनंतर प्रेक्षकांसमोर खेळल्याने चांगले वाटत आहे. मी माझ्या राज्याचा संघ, भारत अ संघासाठी डावाची सुरुवात केली आहे. तसेच मधल्या फळीतही खेळतो. दरम्यान, राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली खेळण्यासाठी त्याने आनंद व्यक्त केला आहे.
कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने ४ गडी गमावून २५८ धावा जमवल्या आहेत. तसेच श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा खेळत आहेत. दोघांनीही आपली अर्धशतके पूर्ण केली आहेत. न्यूझीलंडकडून कायले जेमिन्सनने ३ आणि टीम साऊदीने एक विकेट मिळवला आहे.