India vs New Zealand , 1st Test Live Upadets : पदार्पण श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
जाणून घ्या भारताकडून पदार्पणात शतक झळकावणाऱ्या फलंदाजांची यादी ( 16 Indian batsmen who scored centuries on Test debut)
- लाला अमरनाथ - १५६ धावा वि. इंग्लंड, १९३३
- दीपक शोधान - ११० धावा वि. पाकिस्तान, १९५२
- क्रिपाल सिंह - १००* धावा वि. न्यूझीलंड, १९५५
- अब्बास अली बेग - १३८ धावा वि. इंग्लंड, १९५९
- हनुमंत सिंग - १२८ धावा वि. इंग्लंड, १९६४
- गुंडप्पा विश्वनाथ - १३७ धावा वि. ऑस्ट्रेलिया, १९६९
- सुरींदर अमरनाथ - १३३ धावा वि. न्यूझीलंड, १९७६
- मोहम्मद अझरुद्दीन - ११० धावा वि. इंग्लंड, १९८४
- प्रविण आम्रे - १०३ धावा वि. दक्षिण आफ्रिका, १९९२
- सौरव गांगुली - १३१ धावा वि. इंग्लंड, १९९६
- वीरेंद्र सेहवाग - १३६ धावा वि. दक्षिण आफ्रिका, २००१
- सुरेश रैना - १२० धावा वि. श्रीलंका, २०१०
- शिखर धवन - १८७ धावा वि. ऑस्ट्रेलिया, २०१३
- रोहित शर्मा - १७७ धावा वि. वेस्ट इंडिज, २०१३
- पृथ्वी शॉ - १३४ धावा वि. वेस्ट इंडिज, २०१८
- श्रेयस अय्यर - १०५ धावा वि. न्यूझीलंड, २०२१
पदार्पणवीर श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा आणि शुबमन गिल यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीनंतर टीम इंडियानं कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी ४ बाद २५८ धावा केल्या. न्यूझीलंडच्या कायले जेमिन्सननं तीन विकेट्स घेत टीम इंडियाला सुरुवातीला धक्के दिले. मयांक अग्रवाल ( १३) झेलबाद झाला. शुबमन व चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३३ चेंडूंत ६१ धावा जोडल्या. शुबमनला ५२ धावांवर माघारी फिरावे लागले. पुजारा व अजिंक्य रहाणे ही अनुभवी जोडी कमाल करेल असे वाटत होते, परंतु पुजारा २६ आणि अजिंक्य ३५ धावांवर बाद झाला. अय्यर आणि जडेजा या जोडीनं किवी गोलंदाजांना दाद दिली नाही. या दोघांनी शतकी भागीदारी केली.
दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीच्या षटकातच टीम साऊदीनं ही जोडी तोडली. अम्पायर कॉलमुळे जीवदान मिळालेला रवींद्र जडेजा ५० धावांवर त्रिफळाचीत झाला. शुबमन गिल व अजिंक्य रहाणे यांच्याप्रमाणेच चेंडू जडेजाच्या बॅटीला लागून यष्टींवर आदळला. जडेजा बाद झाल्यानंतर श्रेयसनं आक्रमक खेळ केला. श्रेयस १७१ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह १०५ धावांवर माघारी परतला. वृद्धीमान सहा ( १) व अक्षर पटेल ( ३) हेही टीम साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाले. भारताचे ८ फलंदाज ३१३ धावांवर माघारी परतले.