India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारत-न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्यांच्या वर्चस्वाला अक्षर पटेलनं ( Axar Patel) धक्का दिला. टॉम लॅथम व विल यंग या जोडीनं १५१ धावांची भागीदारी करून न्यूझीलंडसाठी भक्कम पाया रचला. पण, अक्षरनं पाच विकेट्स घेत त्यांना बॅकफूटवर फेकले. लॅथम व यंग यांच्यानंतर लॅथम व केन विलियम्सन ही जोडी वगळता किवींच्या अन्य फलंदाजांना फार मोठी भागीदारी करता आली नाही. अक्षरनं त्याच्या फिरकीच्या जाळ्यात किवी फलंदाजांना अडकवले. वृद्धीमान सहाच्या जागी बदली खेळाडू म्हणून आलेल्या केएस भारतनं ( KS Bharat) यष्टिंमागे कौशल्य दाखवलताना संधीचं सोनं केलं. बापू या टोपणनावानं ओळखल्या जाणाऱ्या अक्षरनं कानपूर कसोटी अनेक विक्रमही मोडले.
रवींद्र जडेजा (५०), शुबमन गिल ( ५२) आणि श्रेयस अय्यर ( १०५) यांच्या दमदार खेळीनंतरही भारताला ३४५ धावांवर समाधान मानावे लागले. टीम साऊदीनं ६९ धावा देताना ५ बळी टिपले. कायले जेमिन्सननं तीन व अजाझ पटेलनं दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम व विल यंग यांनी पहिल्या विकेटसाठी १५१ धावांची भागीदारी केली. आर अश्विननं टीम इंडियाला तिसऱ्या दिवशी पहिले यश मिळवून दिले. केएस भारतनं सुरेख कॅच टिपला अन् विल यंगला माघारी जावं लागलं. यंगनं २१४ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीनं ८९ धावा केल्या. तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपूर्वीच्या अखेरच्या षटकात उमेश यादवनं किवी कर्णधार केन विलियम्सनला ( १८) पायचीत केले.
लॅथम एका बाजूनं खिंड लढवत होता आणि अनुभवी फलंदाज रॉस टेलर त्याच्या साथीला होता. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर पुढे मारण्याच्या प्रयत्नात टेलरनं जवळपास त्याची विकेट दिलीच होती, परंतु केएस भारतनं स्टम्पिंगची संधी गमावली. त्यानंतर रिप्लेत चेंडू बॅटला घासून गेल्याचे दिसले आणि भारतनं एकाच चेंडू कॅचही सोडला व स्टम्पिंगही. पण, अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर भारतनं टेलरचा सुरेख झेल टिपला, त्यापाठोपाठ हेन्री निकोल्सलाही ( २) पायचीत करून अक्षरने किवींना दोन धक्के दिले. भारताच्या मार्गात मोठा अडथळा बनलेल्या लॅथमलाही अक्षर-भारत जोडीनं माघारी पाठवले. अक्षरच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याचा लॅथमचा प्रयत्न फसला अन् भारतनं त्याला यष्टिचीत केलं. लॅथम २८२ चेंडूंत १० चौकारांसह ९५ धावांवर बाद झाला.
रवींद्र जडेजानं अप्रतिम चेंडू टाकून रचिन रवींद्रची ( १३) विकेट घेतली. टॉम ब्लंडल व कायले जेमिन्सन ही जोडी सावध खेळ करून हळुहळू पिछाडी कमी करत होती, परंतु पुन्हा एकदा अक्षरनं विकेट मिळवून दिली. त्यानं ब्लंडलचा ( १३) त्रिफळा उडवला. पुढील षटकात अक्षरनं किवीच्या टीम साऊदीला ( ५) बाद करून डावातील पाचवी विकेट घेतली. अक्षरनं अवघ्या ७ डावांमध्ये पाचवेळा डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्यानं चार्ली टर्नर ( १८८७-८८) व टॉम रिचर्डसन ( १८९३-९५) यांच्यांशी बरोबरी केली. आर अश्विननं विकेट घेताना कायले जेमिन्सनला २३ धावांवर माघारी पाठवले. अश्विननं अखेरची विकेट घेत किवींचा डाव २९६ धावांवर गुंडाळला. भारतानं पहिल्या डावात ४९ धावांची आघाडी घेतली. अश्विननं तीन विकेट्स घेतल्या.