Join us  

IND vs NZ, 1st Test Live Updates : नशिबानं आर अश्विनला विकेट मिळाली, न्यूझीलंडच्या फलंदाजाच्या कृतीवर भडकली टीम इंडिया 

India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारतीय खेळाडूंची चौथ्या दिवसाच्या खेळात वर्चस्व गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 4:43 PM

Open in App

India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारतीय खेळाडूंची चौथ्या दिवसाच्या खेळात वर्चस्व गाजवले. ५ बाद ५१ अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला श्रेयस अय्यर, आर अश्विन, वृद्धीमान सहा व अक्षर पटेल या चौकडीनं सावरलं. त्यांच्या उल्लेखनीय खेळाच्या जोरावर भारतानं दुसरा डाव ७ बाद २३४ धावांवर घोषित केला. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं सलामीवीर विल यंगची विकेट गमावली. पण, ती विकेट आर अश्विनला नशिबानं मिळाली. त्यावरून बराच वेळ खेळपट्टीवर चर्चा रंगली.

भारताच्या पहिल्या डावातील ३४५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडला २९६ धावा करता आल्या. भारतानं ४९ धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाची सुरुवात केली. पण, शुबमन गिल ( १), अजिंक्य रहाणे ( ४), चेतेश्वर पुजारा ( २२), मयांक अग्रवाल ( १७) आणि रवींद्र जडेजा ( ०) हे झटपट माघारी परतल्यानं भारताची अवस्था ५ बाद ५१ अशी झाली होती. मात्र, आर अश्विन व श्रेयस अय्यर या जोडीनं खिंड लढवताना संघाच्या खात्यात ५२ धावांची भर घातली.  जेमिन्सननं ही जोडी तोडताना अश्विनला ( ३२) बाद केलं. श्रेयस आत्मविश्वासानं खेळला. त्याची घोडदौड टीम साऊदीनं रोखली. श्रेयसनं १२५ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६५ धावा करताना संघाला मोठी आघाडी मिळवून दिली.  

श्रेयस- अश्विन माघारी परतल्यानंतर आता टीम इंडियाचा डाव गडगडेल असे वाटले, परंतु  वृद्धीमान सहा व अक्षर पटेल यांनी किवी गोलंदाजांना झुंजवले. या दोघांनी ८व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. दुखापतग्रस्त असूनही सहा खेळपट्टीवर चिटकून बसला अन् त्यानं अर्धशतकही पूर्ण केलं. या जोडीनं ७ बाद १६७ धावांवरून टीम इंडियाला ७ बाद २३४ धावांपर्यंत मजल  मारून दिली. भारतानं किवींसमोर २८४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सहा ६१  व अक्षर २८ धावांवर नाबाद राहिले. 

न्यूझीलंडची दुसऱ्या डावाची सुरूवात काही खास झाली नाही. पहिल्या डावातील अर्धशतकवीर विल यंग ( २) पायचीत झाला. त्यानं DRS घेतला असता तर आर अश्विनला ही विकेट मिळाली नसती. अश्विननं या विकेटसह हरभजन सिंगच्या ४१७ विकेट्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. विल यंग व टॉम लॅथम यांनी चर्चा करण्यात एवढा वेळ घेतला की १५ सेंकदाचा अवधी निघून गेल्यानंतर  यंगनं DRS साठी अपील केली. पण भारतीय खेळाडूंनी त्याला विरोध केला. चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडनं १ बाद ४ धावा केल्या आणि त्यांना पाचव्या दिवशी  २८० धावा करायच्या आहेत. तर भारताला विजयासाठी ९ विकेट्स घ्यायच्या आहेत. 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडआर अश्विन
Open in App