India vs New Zealand, 1st Test Live Updates : पहिल्या डावात ४९ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाला पहिल्या कसोटीत मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण, भारताचा निम्मा संघ ५१ धावांवर माघारी पाठवून न्यूझीलंडनं यजमानांना दणका दिला. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांचा अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला.
रवींद्र जडेजा (५०), शुबमन गिल ( ५२) आणि श्रेयस अय्यर ( १०५) यांच्या दमदार खेळीनंतरही भारताला ३४५ धावांवर समाधान मानावे लागले. टीम साऊदीनं ६९ धावा देताना ५ बळी टिपले. कायले जेमिन्सननं तीन व अजाझ पटेलनं दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम व विल यंग यांनी पहिल्या विकेटसाठी १५१ धावांची भागीदारी केली. पण, तिसऱ्या दिवशी अक्षर पटेलनं त्यांना बॅकफूटवर फेकले. यंग ८९ आणि लॅथम ९५ धावांवर बाद झाले. त्यांच्यानंतर कायले जेमिन्सन ( २३) हा किवींकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. अक्षर पटेलनं ६२ धावांत ५ विकेट्स घेतल्या. आर अश्विननं ८२ धावांत ३ बळी टिपले.
भारताच्या दुसऱ्या डावात शुबमन गिल ( १) दुसऱ्याच षटकात जेमिन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला. अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा ही जोडी सांभाळेल असे वाटत होते, परंतु त्यांनी पुन्हा निराश केलं. कायले जेमिन्सननं चौथ्या दिवसाची पहिली विकेट घेतली ती पुजाराची. जेमिन्सननं टाकलेला बाऊन्सर डाव्या दिशेनं जात होता, परंतु पुजारानं बॅट मागे घेण्यापूर्वी चेंडू बॅटला चुंबन घेऊन यष्टिरक्षकाच्या हाती विसावला, पुजारा २२ धावांवर बाद झाला. अजाझ पटेलनं कर्णधार अजिंक्यला ( ४) पायचीत केले. त्यानंतर टीम साऊदीनं सलामीवीर मयांक अग्रवालला ( १७) आणि रवींद्र जडेजाला ( ०) बाद करून टीम इंडियाचा निम्मा संघ ५१ धावांवर माघारी पाठवला.
भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक ३९ डावांत शतकापासून वंचित राहण्याच्या अजित वाडेकर ( 1968-74) यांच्या नकोशा विक्रमाशी पुजारानं बरोबरी केली. अजिंक्यला २०२१मध्ये १२ कसोटी सामन्यांत २१ डावांत १९.५७च्या सरासरीनं ४११ धावाच करता आल्या आहेत. त्यात २ अर्धशतकांचा समावेश आहे. टीम साऊदीनं भारताता कसोटी क्रिकेटमध्ये ५० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. आर अश्विन व श्रेयस अय्यर खिंड लढवत आहेत.