India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारतीय संघाला पाचव्या दिवसाच्या अखेरच्या षटकापर्यंत न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी झुंजवले. राचिन रविंद्रनं ९१ चेंडू म्हणजे जवळपास १५ षटकं खेळून काढताना किवींचा पराभव टाळला अन् टीम इंडियाला अनिर्णीत निकालावर समाधान मानण्यास भाग पाडले. राचिन व अजाझ पटेल यांनी ५२ चेंडू खेळून काढताना टीम इंडियाला शेवटची विकेट घेऊ दिली नाही.
पदार्पणवीर श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) मिळालेल्या संधीचं सोनं करताना पहिल्या डावात शतक व दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावून दमदार कामगिरी केली. अक्षर पटेल ( Axar Patel) यानं पहिल्या डावात किवींना दणका दिला, वृद्धीमान सहा ( Wridhiman Saha) वेदनेसह खेळला अन् अर्धशतक झळकावून संघाच्या खात्यात महत्त्वपूर्ण धावा जोडल्या. आर अश्विन ( R Ashwin) यानं अष्टपैलू कामगिरी केली. रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) दुसऱ्या डावात सामन्याला कलाटणी दिली. पण, भारताला विजय मिळवता आला नाही.
भारतीय खेळाडूंनी चौथा दिवस गाजवला. ५ बाद ५१ धावांवरून टीम इंडियानं ७ बाद २३४ धावांवर डाव घोषित केला. न्यूझीलंडची दुसऱ्या डावाची सुरूवात काही खास झाली नाही. पहिल्या डावातील अर्धशतकवीर विल यंग ( २) पायचीत झाला. त्यानं DRS घेतला असता तर आर अश्विनला ही विकेट मिळाली नसती. लॅथम व विलियम सोमरविले यांनी पाचव्या दिवसाचे पहिले सत्र संयमानं खेळून काढताना अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी पहिले सत्र सहजतेनं खेळून काढलं. नाइट वॉचमन सोमरविले यानं १०० हून अधिक चेंडूंचा सामना केला.
लंच ब्रेकनंतर पहिल्याच चेंडूवर उमेस यादवच्या बाऊन्सरवर सोमरविलेनं टोलावलेला चेंडू शुबमन गिलनं सुरेखरित्या टिपला. सोमरविले ११० चेंडूंत ५ चौकारांसह ३६ धावा करून माघारी परतला. कर्णधार केन विलियम्सन व लॅथम यांनीही ११६ चेंडूंत ३९ धावांची भागीदारी केली. आर अश्विनच्या चेंडूवर ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटची किनार घेत यष्टिंवर आदळली अन् लॅथमला माघारी जावं लागलं. त्यानं १४६ चेंडूंत ३ चौकारांसह ५२ धावा केल्या. अश्विननं या विकेटसह भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले. अनिल कुंबळे ( ६१९), कपिल देव ( ४३४), अश्विन ( ४१८*), हरभजन सिंग ( ४१७) व इशांत शर्मा ( ३११) ही अशी क्रमवारी आहे.
कर्णधार केन विलियम्सन व रॉस टेलर ही अनुभवी जोडी खेळपट्टीवर असताना किवी ड्रॉसाठी खेळतेय असे चित्र होते. ते डिफेन्सिव्ह खेळत होते. या जोडीनं १० षटकं खेळून काढताना ७ धावाच केल्या. पण,
रवींद्र जडेजानं ही जोडी तोडली अन् त्यापाठोपाठ अक्षर पटेलनंही कमाल केली. जडेजानं टेलरला, तर अक्षरनं हेन्री निकोल्सला माघारी पाठवले. केन खिंड लढवत होता, परंतु जडेजानं त्यालाही हिस्का दाखवला. केन बाद झाला तेव्हा पाचव्या दिवसाचा खेळ संपायला २५ षटकं शिल्लक होती. किवींच्या बऱ्याच विकेट हा दुर्दैवीरित्या पडल्या. किवींनी ७३ ते ८३ या दहा षटकांत केवळ ८ धावा करताना १ विकेट गमावली. अखेरच्या तासाभराच्या खेळात जडेजानं पुन्हा एकदा कमाल करताना कायले जेमिन्सनला ( ५) बाद केले. जेमिन्सननं DRS घेतला असता तर तो नाबाद ठरला असता. टीम साऊदीलाही जडेजानं LBW केले. अखेरच्या पाच षटकांत पंच वारंवार अंधुक प्रकाशाचा आढावा घेताना दिसले. दिवसाचा खेळ संपायला ३ षटकं शिल्लक असताना अचानक सूर्याचा प्रकाश दिसू लागला अन् खेळ पुढे सुरू राहिला. राचिन व पटेल यांनी अखेरची विकेट राखून ठेवताना न्यूझीलंडचा पराभव टाळला.
संक्षिप्त धावफलक - भारत पहिला डाव ३४५ व दुसरा डाव ७ बाद २३४ ( डाव घोषित) वि. वि. न्यूझीलंड - पहिला डाव २९६ व दुसरा डाव ९ बाद १६५ धावा
Web Title: IND vs NZ, 1st Test Live Updates : it's a DRAW in Kanpur, Rachin Ravindra faced 91 balls against Indian spin trio to save New Zealand in the final session
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.