India vs New Zealand, 1st Test Live Updates : पदार्पणवीर श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा आणि शुबमन गिल यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीनंतर टीम इंडियानं कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी ४ बाद २५८ धावा केल्या. न्यूझीलंडच्या कायले जेमिन्सननं तीन विकेट्स घेत टीम इंडियाला सुरुवातीला धक्के दिले, परंतु अय्यर व जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. हा सामना सुरू असताना सोशल मीडियावर #KanpurTest ट्रेंड होऊ लागले. पण, हे ट्रेंड कुण्या खेळाडूमुळे नाही, तर एका व्यक्तिमुळे सुरू झाले आहे. भारताचा माजी सलामीवीर वासीम जाफर यानंही या व्यक्तीचा दखल घेत एक ट्विट केलं आहे.
लोकेश राहुलच्या गैरहजेरीत मयांक अग्रवाल व शुबमन गिल ही जोडी सलामीला आली. पण, ८व्या षटकात जेमिन्सननं टीम इंडियाला पहिला धक्का देताना मयांकला ( १३) झेलबाद केले. शुबमन व चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी १३३ चेंडूंत ६१ धावा जोडल्या. शुबमनला ५२ धावांवर माघारी फिरावे लागले. पुजारा व अजिंक्य रहाणे ही अनुभवी जोडी कमाल करेल असे वाटत होते, परंतु पुजारा २६ आणि अजिंक्य ३५ धावांवर बाद झाला. अय्यर आणि जडेजा या जोडीनं किवी गोलंदाजांना दाद दिली नाही. भारतानं पहिल्या दिवसाच्या खेळात ८४ षटकांत ४ बाद २५८ धावा केल्या आहेत. श्रेयस १३६ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ७५ धावांवर खेळतोय, तर रवींद्र जडेजानंही १०० चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ५० धावा केल्या आहेत.
दरम्यान, सामना सुरू असताना कॅमेरामननं प्रेक्षकांमध्ये एका व्यक्तीवर कॅमेरा नेला आणि तो आहा सुपर डुपर हिट ठरला. व्हिडीओत दिसणारी ही व्यक्ती कुणाशी तरी मोबाईलवर बोलतेय, पण त्याच्या तोंडात पान किंवा सुपारी असावी आणि त्यामुळे तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हा फोटो पाहूनच कसोटी कुठे सुरूय हे सांगता येईल, असा दावा अनेकजण करतायेत..
पाहा व्हिडीओ व त्यावरील मीम्स..