India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारत-न्यूझीलंड पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. टॉम लॅथम व विल यंग यांची दमदादर सलामी देताना टीम इंडियाला बॅकफूटवर फेकले. वृद्धीमान सहाला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आणि त्याच्या जागी केएस भारत मैदानावर उतरला. त्यात खेळपट्टीवर चेंडू फार उसळी घेताना दिसत नसल्यानं फलंदाजांच्या अडचणीत हळुहळू वाढ होताना दिसत आहे. अशात आर अश्विननं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून देताना यंगला माघारी पाठवले. अश्विनला टॉम लॅथमचीही विकेट मिळाली असती, परंतु अम्पायर नितीन मेनन ( Nitin Menon) यानं अपील रद्द केली, परंतु भारतानं DRSही न घेतल्यानं लॅथमला जीवदान मिळाले. त्यानंतर मेनन व अश्विन यांच्यात शाब्दिक वाद झालेला पाहयला मिळाला.
४ बाद २५८ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला टीम साऊदीनं धक्के दिले. रवींद्र जडेजा (५०), शुबमन गिल ( ५२) आणि श्रेयस अय्यर ( १०५) यांच्या दमदार खेळीनंतरही भारताला ३४५ धावांवर समाधान मानावे लागले. टीम साऊदीनं ६९ धावा देताना ५ बळी टिपले. कायले जेमिन्सननं तीन व अजाझ पटेलनं दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम व विल यंग यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना भारताला सडेतोड उत्तर दिले आहे. विल यंगनं भारतातील पहिले व कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. टॉम लॅथमनंही कसोटीतील २१वे अर्धशतक १५७ चेंडूंत पूर्ण केले. दुसऱ्या दिवस अखेर न्यूझीलंडनं एकही विकेट न गमावता १२९ धावा केल्या होत्या.
यंग व लॅथम यांनी १५१ धावांची भागीदारी करून नवा विक्रम केला. २०१६नंतर भारताविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर १५०+ धावांची भागीदारी करणारी ही पहिलीच जोडी ठरली. २०१६मध्ये राजकोट कसोटीत इंग्लंडच्या हमीद व अॅलिस्टर कूक यांनी हा पराक्रम केला होता. आर अश्विननं टीम इंडियाला तिसऱ्या दिवशी पहिले यश मिळवून दिले. केएस भारतनं सुरेख कॅच टिपला अन् विल यंगला माघारी जावं लागलं. यंगनं २१४ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीनं ८९ धावा केल्या.