India vs New Zealand, 1st Test Live Updates : कानपूर कसोटीत श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) दणक्यात पदार्पण केलं. त्यानं अर्धशतक झळकावताना रवींद्र जडेजासह टीम इंडियाचा डाव सावरला आहे. आज सामना सुरू झाला तेव्हा महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्याहस्ते श्रेयसला कसोटी पदार्पणाची टोपी देण्यात आली. श्रेयसनं या टोपीला चुंबन दिले आणि टीव्हीसमोर बसलेले त्याचे वडील संतोष अय्यर हेही तितकेच भावुक झाले. ज्या क्षणाची ते आणि श्रेयस वाट पाहत होते, तो दिवस अखेर आज उजाडला.
श्रेयसला त्याचे ध्येय लक्षात राहण्यासाठी संतोष यांनी २०१७ पासून त्यांचा WhatsApp DP बदललेला नाही. त्यांच्या WhatsApp DP मध्ये श्रेयस भारतीय संघासोबत विजेत्या चषकासह दिसत आहे. २०१७मध्ये भारतानं ऑस्ट्रेलियावर २-१ असा विजय मिळवला होता. त्या मालिकेत रांची कसोटीत क्षेत्ररक्षण करताना विराटच्या खांद्याला दुखापत झाली होती आणि श्रेयसचा संघात समावेश केला गेला होता, परंतु त्याला धर्मशाला येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
''तेव्हापासून मी WhatsApp DP बदललेला नाही. मला तो बदलायचा नव्हता, कारण मला सतत श्रेयसला हे आठवण करून द्यायचे होते की त्याला कसोटी क्रिकेट खेळायचेय. अखेर तो दिवस उजाडला, मी अत्यंत आनंदी आहे,''असे संतोष यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,''कसोटी क्रिकेट हेच खरं क्रिकेट आहे. श्रेयसनं कसोटी क्रिकेट खेळावं ही माझी नेहमीच इच्छा होती. आज ते स्वप्न पूर्ण झाले. मी आणि माझी पत्नी खूप आनंदी आहोत.''
अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल हे भारताचे आघाडीचे फलंदाज १४५ धावांवर माघारी परतले असताना श्रेयस व रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला आहे. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. भारताच्या ८१ षटकांत २४५ धावा झाल्या आहेत. १९७०नंतर पदार्पणात ५व्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५०+ धावांची खेळी करणारा श्रेयस हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. मोहम्मद अझरुद्दीन यानं १९८४मध्ये इंग्लंडविरुद्ध आणि २०२०मध्ये एस बद्रीनाथनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही कामगिरी केली होती.