IND vs NZ 1st Test Match Live | बंगळुरू : सलामीच्या सामन्यातील पहिला डाव एका वाईट स्वप्नासारखा गेल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात चमक दाखवली. मात्र, शेवटच्या फळीतील फलंदाजांना साजेशी कामगिरी करता न आल्याने भारताला मजबूत आघाडी घेता आली नाही. पहिल्या डावातील खराब कामगिरीनंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने चमक दाखवली. टीम इंडिया अवघ्या ४६ धावांत गारद झाल्याने सगळेच अवाक् झाले. बांगलादेशला कसोटी मालिकेत २-० ने पराभूत करणाऱ्या टीम इंडियासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. सलामीचा सामना बंगळुरू येथील चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या ४६ धावांत गडगडली. मग न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात ४०२ धावा करुन यजमानांची कोंडी केली.
भारताच्या दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्माने चांगली सुरुवात केली. त्यांनंतर विराट कोहलीने संयमी खेळी केली. मग सर्फराज खानने १५० धावांची अप्रतिम खेळी करुन भारताचा डाव सावरला. त्याला रिषभ पंतने चांगली साथ देताना ९९ धावांचे योगदान दिले. दुसऱ्या डावात भारताने सर्वबाद ४६२ धावा केल्याने टीम इंडियाला १०६ धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे विजयी सलामी देण्यासाठी न्यूझीलंडसमोर अवघ्या १०७ धावांचे आव्हान आहे. विशेष बाब म्हणजे भारताने ५० धावांत ५ गडी गमावल्याने मोठी आघाडी घेण्याचे स्वप्न भंगले. तसेच ४०८ धावसंख्या असताना भारताच्या हातात सात गडी होते, मात्र पुढच्या ५४ धावांत भारत सर्वबाद झाला अन् पाहुण्या संघाला मोठा फायदा झाला. रिषभ पंत आणि सर्फराज खान यांच्या भागीदारीमुळे टीम इंडिया आज दिवसअखेर १५० हून अधिक धावांची आघाडी घेईल असे अपेक्षित होते. मात्र सर्फराज बाद झाल्यानंतर पंतदेखील फार काळ टिकला नाही अन् तो ९९ धावांवर असताना बाद झाला. पाहुण्या संघाकडून मॅट हेनरी आणि विलियम ओरोर्के यांनी ३-३ बळी घेतले, तर एजाज पटेल (२), टीम साउदी आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
दरम्यान, रिषभ पंतने ८७व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर गगनचुंबी षटकार लगावला. न्यूझीलंडचा प्रमुख गोलंदाज टीम साउदीच्या गोलंदाजीवर पंतने मारलेला षटकार तब्बल १०७ मीटर दूर गेला. पंतचा हा अद्भुत फटका पाहून ग्लेन फिलिप्सदेखील अवाक् झाला. भारताच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल (३५), रोहित शर्मा (५२), विराट कोहली (७०), सर्फराज खान (१५०) आणि रिषभ पंतने (९९) धावा केल्या. ९० षटकांपर्यंत भारताने ५ बाद ४३८ धावा केल्या होत्या. मग लोकेश राहुल (१२), रवींद्र जडेजा (५), आर अश्विन (१५), जसप्रीत बुमराह (०). मोहम्मद सिराज (०) हे स्वस्तात बाद झाल्याने टीम इंडियाची गाडी रुळावरुन घसरली.
भारताचा पहिला डाव
भारताला आपल्या पहिल्या डावात केवळ ४६ धावा करता आल्या. रिषभ पंत (२०) वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. मोहम्मद सिराज (४) धावा करुन नाबाद परतला, तर यशस्वी जैस्वाल (१३), रोहित शर्मा (२), कुलदीप यादव (२), जसप्रीत बुमराहने (१) धावा केली. विशेष बाब म्हणजे विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, रवींद्र जडेजा, आर अश्विन यांना खातेही उघडता आले नाही.
भारताचा संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, सर्फराज खान, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंडचा संघ -
टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉन्वे, विल यंग, डेरिल मिचेल, रचिन रविंद्र, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, टिम साउदी, मॅट हेनरी, जॅकब डफी, एजाज पटेल, विलियम ओरोर्के.
Web Title: IND vs NZ 1st Test Match Live Updates New Zealand need 107 to record a famous Test win in India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.