IND vs NZ 1st Test Match Live | बंगळुरू : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पहिला डाव म्हणजे भारतीय चाहत्यांसाठी एक वाईट स्वप्नच... टीम इंडिया अवघ्या ४६ धावांत गारद झाल्याने सगळेच अवाक् झाले. बांगलादेशला कसोटी मालिकेत २-० ने पराभूत करणाऱ्या टीम इंडियासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. सलामीचा सामना बंगळुरू येथील चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या ४६ धावांत गडगडली. जगातील सर्वोत्तम फलंदाजांनी सज्ज असलेला भारतीय संघ अवघ्या ३१.२ षटकांत गडगडला.
गोलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर किवी संघाला मदत झाली. पण, पाहुणा संघ फलंदाजीला आला तेव्हा सगळे चित्रच बदलून गेले. १७.१ व्या षटकांत भारताने न्यूझीलंडला पहिला झटका दिला. पण त्याआधी भारतीय संघाची पाकिस्तानी खेळाडूंप्रमाणे फजिती झाली. वन डे विश्वचषकात पाकिस्तानच्या इफ्तिखार अहमदने हास्यास्पदपणे सोडलेला झेल आज चाहत्यांना आठवला. कारण लोकेश राहुल आणि विराट कोहली यांच्यात ताळमेळ नसल्याचे दिसले. यामुळे टॉम लॅथमला जीवनदान मिळाले.
दरम्यान, झाले असे की न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम मोहम्मद सिराजच्या चेंडूवर बाद झाला असता. कारण चेंडू त्याच्या बॅटला स्पर्श करुन स्लिपला उभा असलेल्या राहुलच्या दिशेने गेला. परंतु विराट आणि राहुल यांच्याकडून हा झेल सुटला. खरे तर राहुलची ही चूक पाहून कर्णधार रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली. त्याने हातवारे करत संताप व्यक्त केला.
तत्पुर्वी, भारताला आपल्या पहिल्या डावात केवळ ४६ धावा करता आल्या. रिषभ पंत (२०) वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. मोहम्मद सिराज (४) धावा करुन नाबाद परतला, तर यशस्वी जैस्वाल (१३), रोहित शर्मा (२), कुलदीप यादव (२), जसप्रीत बुमराहने (१) धावा केली. विशेष बाब म्हणजे विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, रवींद्र जडेजा, आर अश्विन यांना खातेही उघडता आले नाही.
भारताचा संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, सर्फराज खान, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंडचा संघ -
टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉन्वे, विल यंग, डेरिल मिचेल, रचिन रविंद्र, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, टिम साउदी, मॅट हेनरी, जॅकब डफी, एजाज पटेल, विलियम ओरोर्के.
Web Title: IND vs NZ 1st Test Match Live Updates Virat Kohli and KL Rahul did not have an easy catch as Rohit Sharma was angry
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.