Rohit Sharma PC : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघ सपशेल अपयशी ठरला. अवघ्या ४३ धावांत टीम इंडिया गारद झाल्याने लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. मात्र, आजच्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना कर्णधार रोहित शर्माने आपल्या चुकीची कबुली देताना लोकेश राहुलची पाठराखण केली. खरे तर लोकेश राहुल देखील इतरांप्रमाणे स्वस्तात बाद झाला. याशिवाय त्याने टॉम लॅथमचा एक सोपा झेल सोडून किवी संघाला आयती संधी दिली. पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. आज दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने ५० षटकांत ३ बाद १८० धावा करुन १३४ धावांची आघाडी घेतली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील सलामीचा सामना बंगळुरू येथील चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा होता हे मी मान्य करतो, असे रोहित शर्माने सांगितले. तसेच मला राहुलच्या खेळीबद्दल फार काही बोलायचे नाही. तो सहाव्या क्रमांकावरच खेळेल हे निश्चित आहे. सर्फराज खानच्या बाबतीतही असेच पाहायला मिळाले. विराट कोहलीच्या म्हणण्यानुसार त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले गेले, असे रोहित शर्माने अधिक सांगितले.
भारताचा पहिला डावआपल्या पहिल्या डावात जगातील सर्वोत्तम फलंदाजांनी सज्ज असलेला भारतीय संघ अवघ्या ३१.२ षटकांत गडगडला. भारताला पहिल्या डावात केवळ ४६ धावा करता आल्या. रिषभ पंत (२०) वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. मोहम्मद सिराज (४) धावा करुन नाबाद परतला, तर यशस्वी जैस्वाल (१३), रोहित शर्मा (२), कुलदीप यादव (२), जसप्रीत बुमराहने (१) धावा केली. विशेष बाब म्हणजे विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, रवींद्र जडेजा, आर अश्विन यांना खातेही उघडता आले नाही.
भारताचा संघ -रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, सर्फराज खान, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंडचा संघ - टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉन्वे, विल यंग, डेरिल मिचेल, रचिन रविंद्र, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, टिम साउदी, मॅट हेनरी, जॅकब डफी, एजाज पटेल, विलियम ओरोर्के.